मेहकर : मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने शुक्रवारी येथील खा. प्रतापराव जाधव आणि आ. डॉ. संजय रायमुलकर यांच्या निवासस्थानासमोर मराठा समाज बांधवांच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, सात आॅगस्टपर्यंत सरकारने आरक्षणाचा निर्णय न घेतल्यास नऊ आॅगस्ट पासून जिल्ह्यात चक्का जाम आंदोलनाचा इशारा रविकांत दुपकर यांनी दिला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सध्या सकल मराठा समाज एकत्र आला असून या आंदोलनाची तीव्रता वाढली आहे. गेल्या वर्षी तब्बल ५८ मुकमोर्चे काढण्यात आले होते. त्यानंतर यावर्षीही या आंदोलनाची तीव्रता वाढील असून राज्यभर आंदोलने होत आहे. काही ठिकाणी त्यास हिंसक वळणही लागले होते. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्याच्या समर्थनार्थ शुक्रवारी मराठा समाज बांधवांनी आमदार, खासदारांच्या निवास स्थानासमोर धरणे दिले. यात शिवाजी नगरमधील खा. प्रतापराव जाधव यांच्या निवासस्थानासमोर सकल मराठा समाजाच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. सोबतच सकल मराठा समाजाच्या मागण्यांचे निवेदन खासदार प्रतापराव जाधव यांचे पूत्र ऋषी जाधव यांना देण्यात आले. यानंतर सकल मराठा समाजाने घोषणा देत विविध मार्गाने जात रामनगरातील आ. डॉ. संजय रायमुलकर यांच्या निवासस्थानासमोरही धरणे देत निवेदन दिले. यावेळी पोलिसांचा बंदोबस्तही मोठा होता. आंदोलनामध्ये सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.