लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर : मेहकर तालुक्यातील खंडाळा देवी येथील मराठा समाजातील ३२ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना ३१ जुलै सकाळी उघडकीस आली. या युवकाने मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आत्महत्या केल्याची माहिती मेहकर तालुका सकल मराठा समाज बांधवांनी दिली. मेहकर तालुक्यातील खंडाळा देवी येथील संतोष आत्माराम मानघाले या युवकाने खंडाळा येथीलच आपल्या घराशेजारी असलेल्या गोठ्यामध्ये ३० जुलैच्या रात्री आत्महत्या केली. ही घटना ३१ जुलैच्या पहाटे उघडकीस आली. ही घटना समजताच खंडाळा देवी गावचे सरपंच रतन पाटील मानघाले, गोपाल मानघाले, विजय वायाळ, दिलीप मानघाले, देविदास वंजारे, ऋषी सोनुने यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करीत मेहकर पोलिस आणि महसूल विभागाला माहिती दिली. त्यानंतर पोलीस विभागाने तत्काळ घटनास्थळी जाऊन पंचनामा करून संतोष मानघाले यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी मेहकर येथील शासकीय ग्रामीण रूग्णालयात आणला. घटनेची माहिती मिळताच मेहकर तालुक्यातील सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने मेहकर ग्रामीण रुग्णालयता जमा झाले होते. या ठिकाणी तहसिलदार संतोष काकडे, जिल्हा परिषद सदस्य प्रा. आशिष रहाटे, सिध्देश्वर पवार, प्रा.विनोद पºहाड, वैद्यकिय अधिक्षक विभिषण सारंगकर, ठाणेदार गिरिश थातोड, पोलीस उपनिरिक्षक गौरीशंकर पाबळे, प्रदीप आढाव, पोलीस कॉन्स्टेबल गणेश लोढे, देविचंद चव्हाण, उद्धव फंगाळ, निरज रायमुलकर, फिरोज शहा, सागर कडभणे, विनोद झाल्टे, नीलेश नाहाटा, देवीदास खनपटे यांच्यासह मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. मृतक संतोष मानघाले यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, आई-वडील आहेत. (तालुका प्रतिनिधी)
आंदोलन शांततेच्या मार्गानेच
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी संपुर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसापासून लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू आहे. मात्र, आरक्षण मिळण्यासाठी शासन स्तरावरून उशीर होत असल्याने व काही ठिकाणी मराठा समाजाच्या युवकांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे मराठा समाजाचे आंदोलन तीव्र होत आहे. तर मेहकर तालुक्यात खंडाळा देवी येथील संतोष मानघाले या मराठा समाजाच्या युवकाने आत्महत्या केली आहे. त्यामुळे मराठा समाज बांधवांनी शांतता व लोकशाही मार्गाने आंदोलन करावे, कोठेही अनुचित घटना घडणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन सकल मराठा समाज बांधवांनी केले आहे.
या संदर्भात प्राथमिक माहितीवरून संतोष मानघाले यांच्या कुटूंबावर बॅकेचे कर्ज आहे सध्या पोलीस तपास सुरू असून पोलीसांच्या अहवालावरून पुढील कार्यवाही करण्यात येईल.
- संतोष काकडे, तहसिलदार, मेहकर
मेहकर तालुक्यातील खंडाळा देवी येथील संतोष आत्माराम मानघाले या युवकाने आत्महत्या केल्याची घटना ३१ जुलै रोजी सकाळी उघडकीस आली आहे. या संदर्भात पोलीसांचा तपास जलद गतीने सुरू आहे. तपास पुर्ण झाल्यावर कारवाई करण्यात येईल.
- गिरीश थातोड, पोलीस निरिक्षक, मेहकर