बुलडाणा, दि. ४ : कोपर्डी येथील घटनेच्या निषेधार्थ व समाजहिताच्या मागण्यांसाठी औरंगाबाद, उस्मानाबाद, जळगाव, बीड आणि परभणी या शहरात मराठा समाज बांधवांच्या रेकॉर्डब्रेक मोर्चानंतर आता बुलडाण्यातही मराठा समाज एकवटला आहे. केवळ सोशल मीडियावरील माहितीवरून कोणत्याही निमंत्रणाविना रविवार, ४ सप्टेंबरला कला महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडलेल्या या बैठकीला समाजबांधवांची विक्रमी उपस्थिती होती. या विक्रमी बैठकीत येत्या २६ सप्टेंबर रोजी विशाल मोर्चा काढण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. कोपर्डी येथील घटनेच्या निषेर्धात राज्यभर मराठा समाज एकवटतो आहे. बुलडाणा जिल्ह्यातही ही एकीची ज्योत रविवारी नियोजन बैठकीच्या माध्यमातून पेटली. कोणालाही वैयक्तिक निमंत्रण न देता केवळ व्हॉटस् अँप व फेसबुक या सोशल मीडियाच्या माध्यमातून बैठकीची माहिती देण्यात आली होती. चार दिवसांपूर्वी दिलेल्या माहितीनंतर एवढय़ा कमी कालावधीत या बैठकीसाठी समाजबांधव विक्रमी संख्येने उपस्थित होते. खासदार, माजी मंत्री, मराठा समाजाचे सर्व आमदार, माजी आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, माजी जि.प. अध्यक्ष, आजी, माजी पंचायत समिती सदस्य यांच्यासह राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय क्षेत्रात काम करणार्या मान्यवरांसह सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी, विद्यार्थिंंनी, महिला प्रतिनिधींचीही यावेळी विशेष उपस्थिती होती. २६ सप्टेंबर रोजी काढण्यात येणारा मोर्चा कुठल्याही समाजाच्या, पक्षाच्या किंवा शासन, प्रशासनाच्या विरोधात नसून, मराठा समाजाच्या एकत्वासाठी आणि न्याय हक्कासाठी राहील, ही भूमिका या बैठकीच्या सुरुवातीलाच स्पष्ट करण्यात आली. समाजबांधवांनी जास्तीत जास्त संख्येने या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. काही मिनिटांतच जमला लाखोंचा निधी ! मोर्चासाठी लागणारा खर्च मोठा असल्याने समाजातून वर्गणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. वर्गणीचे आवाहन करताच अवघ्या काही मिनिटांमध्ये लाखो रुपयांची वर्गणी जमा झाली; परंतु सदर निधी हा कुणाजवळ जमा न करता बँकेमध्ये एक संयुक्त खाते उघडून त्यामध्ये जमा करावा आणि नंतर त्या संपूर्ण रकमेचा हिशेब सर्वांंसमोर मांडावा, असे ठरले. महिलांची उपस्थिती ठरणार लक्षवेधीबैठकीला उपस्थित असलेल्या सर्वांंनी सहपरिवार मोर्चात सहभागी होण्याचा निर्धार केला. ह्यपाटील मोर्चात आणि पाटलीनबाई घरीह्ण अशी परिस्थिती उद्भवू नये आणि समाजाच्या एकोप्यासाठी घराघरांतील महिलांनीही या मोर्चात सहभागी होण्याचा चंग बांधला आहे. त्यामुळे या मोर्चातील महिलांची उपस्थिती लक्षवेधी ठरण्याचे संकेत या बैठकीत मिळाले.
बुलडाण्यातही मराठा समाजाने बांधली एकीची वज्रमूठ!
By admin | Published: September 05, 2016 12:47 AM