- ब्रम्हानंद जाधव
बुलडाणा: जिल्ह्यातील ४० ठिकाणच्या रस्त्याच्या कामांना मार्च एंडची डेडलाईन असल्याने रस्ते विकासाची कामे सध्या वेगात सुरू आहेत. जिल्ह्यातील विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या रस्त्याच्या कामांसाठी ९३ कोटी ४५ लाख ७ हजार रुपयांपर्यत निधी खर्च करण्यात येत आहे. यामध्ये ग्रामीण भागातील रस्त्यांवर नवीन डांबरीकरण, रुंदीकरण, नुतनीकरण, रस्ते खड्डेमुक्त तथा अन्य दुरूस्तीची कामे करण्यात येत आहेत. शासनाने राज्यभर रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेतलेली आहेत. रस्ते हे विकासाच्या नाड्या असतात. त्यामुळे सर्वत्र जलदगतीने रस्त्यांचा विकास करण्यास शासनाकडून प्राधान्य देण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व गावे पक्क्या व डांबरी रस्त्याने जोडण्यात येत आहेत. जिल्ह्यातून जाणारे प्रमुख राज्य महामार्ग आणि राज्य मार्ग राष्ट्रीय महामार्गात रुपांतरित करण्यात आल्याने जिल्ह्यात राज्य महामार्गाचा अनुशेष निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी ५५८ किलोमिटर झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख राज्य महामार्ग आणि राज्य मार्गाची संख्या व लांबी कमी झाली आहे. मलकापूर-जालना हा प्रमुख राज्य महामार्ग राष्ट्रीय माहामार्ग बनल्यामुळे जिल्ह्यातील मुख्य जिल्हा मार्ग, अन्य जिल्हा मार्ग काही ग्रामीण रस्तेही आता चकाकत आहेत. सार्वजनीक बांधकाम विभागांतर्गत जिल्ह्यातील ४० ठिकाणच्या रस्त्यांची कामे सध्या युद्धपातळीवर सुरू आहेत. मार्च २०१८ मध्ये ९३ कोटी ४५ लाख ७ हजार रुपये निधी या रस्ता कामांसाठी मंजूर करण्यात आला होता. मार्च २०१९ पर्यंत ही कामे पूर्ण करावे लागत असल्याने सध्या या कामांकडे लक्ष दिल्या जात आहे. यामध्ये प्रमुख जिल्हा मार्ग व ग्रामीण भागतील अंतर्गत रस्त्यांच्या कामांचा समावेश आहे. रस्त्यांच्या दुरूस्तीबरोबरच रुंदीरकण, डांबरीकरण, मजबुतीकरण, नुतनीकरण करण्याचे कामे होत आहेत.
पुलांच्या बांधकामाचाही समावेशसावर्जनीक बांधकाम विभागाने रस्त्याबरोबरच पुलांच्या बांधकामाकडे लक्ष केंद्रीत केले आहे. जिल्ह्यातील दहा ठिकाणी छोट्या-मोठ्या पुलांचे बांधकाम सध्या प्रगतीपथावर आहे. त्यामध्ये सिंदखेड राजा, मोताळा, चिखली, मेहकर, देऊळगाव राजा या तालुक्यातील दहा पुलांचा समावेश आहे. या कामांसाठी कोटी रुपये निधी खर्च अपेक्षीत आहे.
रस्त्याची कामे युद्धपातळीवरआगामी लोकसभा निवडणुक व आचार संहिता लागण्यापूर्वी ही विकास कामे पूर्ण व्हावीत, यासाठी प्रशासनाच्या हालचाली सुरू आहेत. आचार संहितेच्या अनुषंगाने रस्त्याची कामे सुद्धा युद्धपातळीवर करण्यात येत आहेत. नोव्हेंबरमध्ये काही रस्त्यांच्या नव्या कामांनाही मान्यता देण्यात आलेली आहे. ती कामेही लवकरच सुरू होणार आहेत.