किमान वेतन अधिनियम जनजागृती
बुलडाणा : किमान वेतन अधिनियम १९४८ ची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी सरकारी कामगार अधिकारी कार्यालयामार्फत २२ फेब्रुवारीपासून जनजागृती सप्ताह राबविण्यात येत आहे. किमान वेतन अधिनियमांतर्गत विविध आस्थापना, दुकाने, हॉटेल्स, कारखाने, विविध उद्योग व इतर व्यापारी संस्थांतर्गत एकूण ६७ अनुचित उद्योगातील कामगारांसाठी किमान वेतन दर निश्चित केलेले आहेत. कलम १२ (१) नुसार कामगारास किमान वेतन देणे बंधनकारक आहे. या संदर्भात जनजागृती करण्यात येत आहे.
राष्ट्रीय पशुधन अभियान
धामणगाव बढे : राष्ट्रीय पशुधन अभियाना अंतर्गत मुरघास निर्मितीकरिता सायलेज बेलर मशिन युनिट स्थापन करण्यात येणार आहे. या मशीनसाठी सहकारी दूध उत्पादक संघ, संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, संस्था, स्वयंसहाय्यता बचत गट व गोशाळा, पांजरपोळ, गौरक्षण संस्था यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. या योजनेसाठी अर्थसाहाय्य राहणार असून, अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १० मार्च आहे.
खुल्या बाजारात कापूस विक्री वाढली
बुलडाणा : खुल्या बाजारपेठेत कापसाची दरवाढ झाली असताना, सीसीआयने कापसाच्या दरात घसरण केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जिल्ह्यातील सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्राकडे पाठ फिरविल्याचे दिसून येते. त्यामुळे सध्या खुल्या बाजारातील कापूस विक्री वाढलेली आहे.
कांदा पिकामध्ये आंतरमशागत
बुलडाणा : यंदा रबी हंगामापाठोपाठ उन्हाळी कांदा लागवडही वाढलेली आहे. दिवाळीनंतर कांद्याला चांगला भाव मिळाल्याने शेतकरी कांदा पिकांकडे वळले आहेत. सध्या कांदा पिकात आंतरमशागत करण्याच्या कामांनी वेग धरला आहे.
३७ पॉझिटिव्ह रुग्ण
बुलडाणा : शहरात गुरुवारी ३७ कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यांना उपचारासाठी कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शहरातील रुग्णसंख्या आता झपाट्याने वाढत आहे
.सिंचन विस्कळीत
साखरखेर्डा : परिसरातील शेतकऱ्यांनी माेठ्या प्रमाणात गहू पिकांची पेरणी केली आहे. गत काही दिवसांपासून शेतातील विद्युत पुरवठा वारंवार विस्कळीत होत असल्याने सिंचन विस्कळीत होत आहे.
शेतकऱ्यांना कृषी सल्ला
बुलडाणा : येथील जिल्हा कृषी हवामान केंद्राने शेतकऱ्यांना हवामान साक्षर करण्याचा वसा घेतला आहे. आतापर्यंत केंद्राने जिल्ह्यातील २१ हजार २३७ शेतकऱ्यांपर्यंत कृषी सल्ला पत्रिका पोहोचवून मार्गदर्शन केले आहे.
नियम पाळा: भगत
देऊळगाव मही : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. नागरिकांनी नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार डॉ. सारिका भगत यांनी केले.