खामगाव - शासनसेवेत समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी राज्यभरातील बाजार समिती कर्मचाऱ्यांनी गुरुवारी (२८ फेब्रुवारी) बंद पुकारला आहे. बाजार समितीतील मालाच्या आवकवर परिणाम झालेला दिसून येतो. दरम्यान खामगाव बाजार समितीचा आढावा घेतला असता शेतकऱ्यांचा माल खरेदी केला जात असल्याचे दिसून आले. बाजार समिती सभापती संतोष टाले यांनी शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेवून ज्या शेतकऱ्यांचा माल विकायचा असेल त्यांचा माल निश्चित खरेदी केला जाईल असे आवाहन केले आहे.
शासनाच्या बाजार समितीच्या आर्थिक हिताविरोधातील निर्णयामुळे बाजार समित्यांचे उत्पन्न कमालीचे घटले आहे. यामुळे बऱ्याच बाजार समित्यातील कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न बिकट झाला आहे. या पार्श्वभुमीवर शासनाने बाजार समिती कर्मचाऱ्यांना शासनसेवेत घेऊन त्यांना दिलासा देण्याची मागणी गेल्या दशकभरापासून प्रलंबित आहे.याच मागणीसाठी राज्यातील सर्व बाजार समितीचे कर्मचाऱ्यांनी मुंबईतील आझाद मैदानावर धरणे सुरू केले आहे. जिल्ह्यातील खामगाव, शेगाव, संग्रामपूरसह 13 बाजार समित्यांचे कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत. मराठा ठोक मोर्चाचे प्रमुख आबासाहेब पाटील व राज्य बाजार समिती कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दिलीपराव डेबरे यांच्या नेतृत्वात या कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू झाले आहे.