लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा/लोणार : जीएसटीबाबत अनभिज्ञता अधिक असल्याने व्यापाऱ्यांमध्ये सर्वत्र संभ्रम निर्माण झाला आहे. याचा परिणाम बाजारपेठेवर झाला असून, अजूनही व्यापाऱ्यांनी नव्या करानुसार व्यवहार करण्याला सुरुवात केली नाही. त्यामुळे बाजारपेठ पूर्णत: थंडावली आहे. १ जुलैपासून संपूर्ण देशात वस्तू आणि सेवा कर अर्थात एकच कर प्रणाली लागू झाली आहे. यात नेमक्या कोण-कोणत्या गोष्टींचा समावेश आहे? तसेच यासाठी आवश्यक काय? तयारी करावी लागेल, यासंदर्भात कार्यशाळा, सेमिनार घेऊनही व्यापारी अद्याप याबाबत संभ्रमात आहेत. पुरेशी माहिती व्यापारी वर्गाला नसल्याने ही स्थिती आहे. त्यामुळे जीएसटीच्या धसक्याने व्यापारपेठ थंडावलेली आहे.जीएसटीच्या अनुषंगाने शासनाकडून मार्गदर्शक तत्त्वे जारी झाली. जीएसटी अंमलबजावणीसाठी आवश्यक डिजिटल माध्यमांचा वापर कसा करावा? याबाबत जागरुकता व मार्गदर्शनाचे कार्यक्रम विक्रीकर विभागाकडून होत असले, तरी ते व्यापाऱ्यांना ठिक समजले नाहीत. परिपूर्ण मार्गदर्शन मिळाले नसल्याने नवीन फायलिंग करणे, व्यापाऱ्यांना कमी वेळात शक्य होणार नाही व नवीन कर प्रणालीनुसार कशाप्रकारे दस्तऐवज तयार ठेवावे, याबाबत व्यापारी वर्गात संभ्रम आहे. जुनी करप्रणाली आणि नवीन करप्रणाली यातील फरकदेखील व्यापाऱ्यांना लक्षात घेणे गरजेचे आहे. परंतु, नवीन कर प्रणालीनुसार काम कसे करायचे, हेच जर माहीत नसेल, तर रोजचे व्यवहार कसे करायचे? असा प्रश्न अनेक व्यापाऱ्यांना पडलेला आहे. मागील महिन्यापासून व्यापाऱ्यांनी जीएसटीच्या धसक्याने खरेदी दहा टक्क्यावर आणली. याचा थेट परिणाम व्यापारपेठेवर होत आहे. नागरिकांना आवश्यक वस्तू मिळण्यास अडचणी निर्माण होत आहेत. ‘जीएसटी’च्या माहितीसाठी ‘हेल्पलाइन’देशभरात जीएसटी (वस्तू व सेवा कर) कायदा लागू करण्यात आला आहे. या कायद्यांतर्गत जिल्ह्यातील व्यावसायिकांनी नोंदणी केली आहे. व्यावसायिकांना तसेच नागरिकांना कर भरण्यामध्ये कोणतीही अडचण येऊ नये, याकरिता जिल्ह्यामध्ये हेल्पलाइन सुरू करण्यात आलेली आहे. या क्रमांकावर येणाऱ्या तक्रारींसाठी विक्रीकर अधिकारी मिलिंद खुणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तरी जीएसटीविषयक अडचणी असल्यास सदर हेल्पलाइनचा उपयोग करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले आहे. जीएसटीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे, निवासी उपजिल्हाधिकारी ललित वराडे आदी उपस्थित होते. याप्रसंगी पाचारणे म्हणाले, यासोबतच वस्तू व सेवाकर भवन खामगाव येथे वस्तू व सेवाकर मदत कक्षसुद्धा स्थापन करण्यात आलेला आहे. जिल्ह्यात ६ हजार १०० व्यावसायिकांची नोंदणी अपेक्षित होती. प्रत्यक्षात त्यापैकी ९५ टक्के व्यावसायिकांनी नोंदणी केलेली असून, उर्वरित व्यावसायिक जुन्या कायद्यातील नोंदणी रद्द करण्यात येणार आहे. ज्या व्यावसायिकांना वस्तू व सेवाकराची नव्याने नोंदणी करावयाची असेल, त्यांना सदर नोंदणी आॅनलाइन करण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यासाठी संकेतस्थळावर सुविधा करण्यात आली आहे. तरी नागरिकांनी अथवा व्यावसायिकांनी वस्तू व सेवा कराच्या बाबतीत कोणतीही अडचण उद्भवल्यास हेल्पलाइन किंवा मदत कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे, असे उपआयुक्त टी.के. पाचरणे यांनी कळविले आहे.व्यापाऱ्यांमध्ये कुजबुज जीएसटीबाबत परिपूर्ण माहिती मिळत नसल्याने आता नेमका कोणत्या वस्तूसाठी किती टॅक्स भरावा लागणार, हेच मुळात व्यापाऱ्यांना समजून येत नाही. यात काही चुका झाल्या, तर पुन्हा आपल्या मागे दंडात्मक कारवाईचा ससेमिरा लागेल. या भीतीपोटी व्यापारी एकमेकांना कशाला किती टॅक्स भरावा लागेल, याची चर्चा करीत असल्याचे बाजारपेठेत दिसून येत आहेत.जीएसटीबाबत परिपूर्ण माहिती देणारे शिबिर संबंधित विभागाकडून आयोजित करणे अपेक्षित आहे. जेणेकरून व्यापाऱ्यांच्या संकल्पना, या नवीन कर प्रणालीबाबत स्पष्ट होतील.-गोपाल मापारी, व्यापारी, लोणार जीएसटीला घाबरण्याचे कारण नाही. कारण ही प्रणाली ग्राहक, व्यापाऱ्यांच्या फायद्याची असून, प्रणाली समजून घेणे गरजेचे आहे. शिल्लक मालाचे रेकॉर्ड असल्यास करप्रणालीला सामोरे जाणे अवघड नाही.-विपुल वक्कानी, कर सल्लागार
‘जीएसटी’च्या धसक्यानेच बाजारपेठ थंडावली!
By admin | Published: July 04, 2017 12:18 AM