ओमप्रकाश देवकर, मेहकर : मागील दोन आठवड्यांतील शेतमालाचे बाजारभाव हे स्थिर आहेत. मात्र लाॅकडाऊन जाहीर करण्यात आल्याने कृषी उत्पन्न बाजार समिती मेहकर येथे येणाऱ्या मालाची आवक घटली आहे.
मागील वर्षी कोराेनाने हाहाकार माजविला. देशभरात लाॅकडाऊन जाहीर करण्यात आले होते. याच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा या वर्षीसुद्धा फटका बसला आहे. शेतमाल विक्रीसह शेतकऱ्यांना फळ विक्री व भाजीपाला विक्री करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. अनेक ठिकाणी तर फळे व भाजीपाला शेतकऱ्यांना कवडीमोल भावात विकावा लागत आहे. शेतकऱ्यांनी वर्षभर मेहनत करून शेतात शेतमाल पिकविला त्या शेतमालाला पाहिजे त्या प्रमाणात बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी तो माल विक्री करण्याची घाई केली नाही. शेतकरी बाजारभाव वाढतील या आशेवर थांबले होते. सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिळत असलेले बाजारभाव हे गेल्या दोन आठवड्यांपासून काही प्रमाणात स्थिर आहेत. मात्र, संचारबंदीमुळे शेतमालाची आवक घटली.
कोट
सध्या बाजारभाव काही प्रमाणात स्थिर आहेत. मात्र कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे अनेक वेळेस मार्केट बंद राहते. शिवाय संचारबंदी लागू करण्यात आल्याने मालाची येणारी आवकही काही प्रमाणात घटली आहे.
- नारायण काबरा, अडते/ संचालक, मेहकर
कोटः
शेतकऱ्याने वर्षभर मेहनत करून शेतमाल पिकविला. मात्र उत्पादन खर्च हा उत्पन्नापेक्षा अधिक असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. पाहिजे त्या प्रमाणात बाजारभाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यावर आर्थिक संकट ओढवले आहे.
- विनोद राजगुरू, शेतकरी, चिंचोली बोरे
कोटः
शासनाकडून दरवर्षी शेतमालाचे हमीभाव जाहीर करण्यात येतात. मात्र त्या हमीभावापेक्षा कमी दरात शेतमाल खरेदी केला जात असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
- एकनाथ सास्ते, शेतकरी, दुधा
कृउबास मेहकरचे बाजारभाव - गहू-1350 ते 1650,तूर-6300 ते 6810,सोयाबीन-6700 ते 7075,हरबरा-4200 ते 5000. दि.7/5/21 गहू-1400 ते 1650,तूर-6000 ते 6700,सोयाबीन-6600 ते 7500,हरबरा-4250 ते 4995