एक २५ वर्षीय महिला आपल्या दोन वर्षीय मुलीला घेत लोणी रस्त्यावर २० फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजेदरम्यान धावत असताना दिसली. मात्र ही महिला रडण्याशिवाय कुठलीच माहिती देत नव्हती. ही बाब परिसरातील तानाजी मापारी, भारत राठोड, निखील राठोड, सोम शिंदे यांनी राहुल सरदार यांना सांगितली. राहुल सरदार यांनी महिला व तिच्या मुलीबाबत पाहणी करीत घटनेचे गांभीर्य ओळखत लोणार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना दिली. दरम्यान, देशमुख यांनी आपले सहकारी पोलीस उपनिरीक्षक भारत बर्डे, चंद्रशेखर मुरडकर, ना.पो.कॉ. जगदीश सानप, पो.कॉ. तेजराव भोकरे, म.पो.कॉ. सीमा उन्हाळे, चालक सुधाकर काळे यांना घटनास्थळी पाठविले. या वेळी पोलीस उपनिरीक्षक भारत बर्डे यांनी या महिलेला पुढील चौकशीसाठी लोणार पोलीस स्टेशनला आणले. महिलेजवळील बॅगची पंचसमक्ष तपासणी केली असता बीड जिल्ह्यातील केज येथील डॉक्टरची औषधाची चिठ्ठी मिळून आली. त्यामध्ये त्या महिलेच्या पतीचे नाव समजले. या वेळी या अगोदर कर्तव्यावर असताना पोलीस उपनिरीक्षक भारत बर्डे यांना संपूर्ण बीड जिल्ह्याची माहिती असल्याने त्यांनी त्या महिलेबाबत सखोल चौकशी करीत माहिती मिळविली. त्यानंतर या महिलेला पाणी, चहा-बिस्कीट देत आस्थेवाईकपणे चौकशी केली असता, तिने लोणार तालुक्यातील गुंजखेड येथील तिच्या मामाच्या घरी जाण्यासठी निघाल्याचे सांगितले. त्यानंतर तात्काळ पोलीस उपनिरीक्षक भारत बर्डे यांनी तपासचक्रे फिरवीत गुंजखेड येथील पोलीस पाटील, सरपंच व इतर नातेवाईकांना तिचा व्हॉटस्ॲपवरून फोटो पाठवत तिची ओळख पटविली. त्यानंतर त्या महिलेला गुंजखेड येथील तिच्या मामाच्या स्वाधीन करण्यात आले.
विवाहितेसह तिच्या मुलीला पोहचविले सुखरूप घरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 4:23 AM