लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा : सिंदखेड राजा तालुक्यातील पळसखेड चक्का येथील हुतात्मा जवान प्रदीप मांदळे यांचे गावात स्मारक होणार असून, या स्मारकाच्या जागेची पाहणी अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी १९ डिसेंबर रोजी केली. हुतात्मा जवान प्रदीप मांदळे यांचे गावात स्मारक असावे अशी ग्रामस्थांची इच्छा होती. त्यानुषंगाने या स्मारकासाठीची आवश्यक ती कार्यवाही त्वरित पूर्ण करावी, अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.दरम्म्यान, प्रदीप मांदळेंच्या पार्थिवावर २० डिसेंबर रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. जम्मू काश्मीरमधील द्रास सेक्टरमध्ये कर्तव्यावर असताना १५ डिसेंबर रोजी अंगावर बर्फाचा ढीग पडून प्रदीप मांदळे हे हुतात्मा झाले होते. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी तातडीने त्यांच्या राहत्या गावी पळसखेड चक्का येथे सांत्वनपर भेट देऊन शोकसंवेदना व्यक्त केल्या होत्या. पळसखेड चक्कामधील प्रदीप मांदळे हे २००८ मध्ये औरंगाबादला घेण्यात आलेल्या सैन्य भरतीमध्ये महार रेजिमेंटमधून देशसेवा करण्यासाठी भरती झाले होते. घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. साहेबराव मांदळे यांच्या निधनानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी प्रदीप मांदळे यांच्यावर आली होती. अशा परिस्थितीतदेखील त्यांनी देशसेवेसाठी सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला. लहान भाऊ विशाल हादेखील सैन्यामध्ये कार्यरत आहे. तर दुसरा भाऊ संदीप हा कृषी सहायक आहे.हुतात्मा जवान प्रदीप मांदळे यांचे भाऊ म्हणाले की प्रदीप मांदळे हे अत्यंत चांगल्या स्वभावाचे व घराला पुढे नेणारे होते. हुतात्मा प्रदीप मांदळे यांच्या पार्थिवावर २० डिसेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता त्यांच्या मूळ गावी पळसखेड चक्का येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील
हुतात्मा प्रदीप मांदळे यांचे पळसखेड गावात होणार स्मारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2020 11:08 AM
Martyr Pradip Mandale News स्मारकाच्या जागेची पाहणी अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी १९ डिसेंबर रोजी केली.
ठळक मुद्दे १५ डिसेंबर रोजी अंगावर बर्फाचा ढीग पडून प्रदीप मांदळे हे हुतात्मा झाले होते. हुतात्मा जवान प्रदीप मांदळे यांचे गावात स्मारक असावे अशी ग्रामस्थांची इच्छा होती.