लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : बाजारात चढ्या दराने मास्क विक्री होत असून ४९ रूपये दर असलेल्या एन-९५ मास्क तब्बल ९० ते १०० रूपये एवढ्या चढ्या दराने विकत आहेत. तर डिस्पोजल मास्कही १० ते १५ रूपयांत विक्री होत असल्याचे लोकमतने २ नाेव्हेंबर रोजी केलेल्या रिअॅलिटी चेकमध्ये निदर्शनास आले. खामगाव शहरातील काही मोजक्याच मेडिकलवर शासनाच्या दरपत्रकानुसार मास्क विक्री केली जात आहे. कोरोना संकटाचा धोका अजून संपला नाही. कोरोनाचा संसर्ग रोखता यावा, यासाठी नागरिकांनी मास्कचा वापर करणे अनिवार्य आहे. शासनाने एन ९५ तसेच दोन व तीन पदरी मास्कचे दर निश्चित केले आहेत. परंतु या मास्कची चढ्या दराने विक्री होते. शहरातील एका मेडिकलवर एन९५ मास्क ७० ते ८० रूपये दराने विक्री करतान दिसून आले. दोन पदरी मास्क १० ते १५ तर तीन पदरी मास्क १५ ते २० रूपये दराने विक्री करताना आढळुन आले. शासनाच्या दरपत्रकाबाबत औषधी विक्रेत्यास माहिती नव्हती, शिवाय दर्शनी भागात मास्क दरपत्रकाचा फलकही नव्हते.