मलकापुर : स्थानिक सिनेमा रोडवरील बाजारपेठेत असलेल्या दुकानांना रविवारी मध्यरात्री भीषण आग लागली. याआगीत जवळपास सहा ते सात दुकाने जळून खाक झाली. अग्निशमन दलाच्या तब्बल पाच तासाच्या प्रयत्नानंतर सोमवारी पहाटे आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आले. या आगीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
स्थानिक सिनेमा रोडवरील मुख्य बाजारपेठेत ६ ते ७ दुकानांना काल मध्यरात्री १ च्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. ही बाब नगरसेवक अनिल गांधी यांना कळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होत नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला तात्काळ पाचारण केले. दरम्यान सत रमेती राम टोबॅको, सुरजमल ॲन्ड कंपनी, गांधी बुक डेपो प्रिंटिंग प्रेस ,हारूण अजीज यांच्या दुकानामागची दुकाने व गोडाऊनमधून आगीचे लोळ उठताना दिसले. आगीचे भीषण स्वरूप पाहता अग्निशमन दलाच्या पथकाने आग विझवणे करिता शर्थीचे प्रयत्न सुरू केले. पोलीस प्रशासन तसेच वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीही घटनास्थळी दाखल होत आग विझविण्यात सहकार्य केले. तब्बल पाच तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. या आगीत वह्या, पुस्तके, स्टेशनरी, कटलरी, प्रिंटिंग प्रेस चे साहित्य, मशनरी, संगणक, पुठ्ठा, कागद, धान्य, तंबाखू आदी साहित्या सह तीन ते चार दुकाना पूर्णत: जळून खाक झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शहरातील अग्निशमन दलाच्या २ गाड्यासह, विरसिंग नरसीभाई दंड, कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या अग्निशमन ची मदत घेण्यात आली. आगीत अंदाजे दीड ते दोन कोटी पर्यंत नुकसान झाल्याची प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आगीचे कारण अद्यापपर्यंत स्पष्ट झालेले नाही. आग विझवण्या करिता अग्निशमन दलाचे वासुदेव भोपळे, सुरजसिंह राजपुत, दिपकसिंग राजपुत, निलेश चोपडे, शुभम राजपुत तसेच पीएसआय ठाकरे, एएसआय दिपक चंद्रशेखर, शैलेश सोनोने, अनिल डागोर, सलिम बर्डे, मिलिंद ताकतोडे, मोरेे सह इतर पोलीस कर्मचारी व काही स्थानिक नागरिकांनी सहकार्य केले.