लोकमत न्यूज नेटवर्कडोणगाव : येथील सांडपाण्याच्या नाल्या घाणीने भरल्याने ग्रामपंचायत सदस्यच त्रस्त झाले आहेत. घाणीच्या साम्राज्यामुळे ग्रामपंचायत सदस्य चाँद बी कासम बागवान व त्यांचे पती कासम बागवान यांनी १६ जून रोजी सकाळी ११.३० वाजता ग्रामपंचायतसमोर चटई आंदोलन सुरू केले. २५ हजार लोकसंख्या असलेल्या डोणगाव येथे पहिल्याच पावसात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून, नाल्या घाणीमुळे तुडुंब भरुन वाहत आहेत. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, पहिल्याच पावसात प्रशासनाचा कारभार चव्हाट्यावर आला. यावर ग्रा.पं.ने कोणतीच कारवाई न केल्याने व वारंवार स्वच्छतेसाठी ग्रा.पं.ला कळवूनही सरपंच व ग्रामविकास अधिकारी टाळाटाळ करीत असल्याने व स्वत:च्या घरासमोरील नाली घाणीने भरल्याने त्रस्त विद्यमान ग्रा.पं.सदस्य चांद बी कासम बागवान व त्यांचे पती कासम बागवान यांनी १६ जून रोजी सकाळी ११.३० वाजता ग्रा.पं.समोर चटई टाकून बसले व जोपर्यंत नाल्या साफ होत नाही, तोपर्यंत चटई आंदोलन करणार असल्याचे सांगितले. चाँद बी कासम बागवान वार्ड नं.६ च्या सदस्य असून, वार्ड नं.५ मध्ये राहतात. पण, अनेक दिवसांपासून ग्रा.पं.ने स्वच्छता मोहीम न राबविल्या ऐन पावसाळ्यात नाल्या घाणीने तुडुंब भरलेल्या आहेत. त्यात मच्छरांचे प्रमाण वाढलेले असल्याने वारंवार सदस्यांनी ग्रा.पं.ला कळविले; परंतु ग्रा.पं.ही अकार्यक्षम झाल्याने खुद्द ग्रा.पं. सदस्यालाच स्वच्छतेसाठी ग्रा.पं.समोर बसावे लागत असल्याने सर्वसामान्यांचे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ग्रा.पं.ची चौकशी करुन स्वच्छतेवर किती खर्च झाला, याबाबत माहिती घेऊन दोषींवर कारवाई करावी व गावात स्वच्छता राबवावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. १७ जूनपर्यंत वार्ड क्र.६ मधील नाल्यामधील रोडवर आलेले पाणी व आठवडी बाजारातील घाण साफ न केल्यास पुन्हा ग्रामपंचायतसमोर स्वच्छता होईपर्यंत बेमुदत उपोषण करण्याचा इशारा चटई आंदोलनाला बसलेल्या चाँद बी शेख कासम बागवान यांनी ग्रामपंचायतला दिला आहे.
ग्रामपंचायतसमोर ‘चटई’ आंदोलन
By admin | Published: June 17, 2017 12:12 AM