राज्य सरकारने गोरगरीब व गरजवंतांना स्वस्तात जेवण उपलब्ध व्हावे, यासाठी शिवभोजन थाळी देण्याची योजना गत वर्षापासून हाती घेतली आहे. याअंतर्गत चिखलीत डी.पी.रोडस्थित एका ज्वेलर्सजवळ शिवभोजन केंद्राची सुरुवात १ एप्रिल २०२० रोजी केली. या केंद्रामुळे अनेक कष्टकरी, गोरगरीब, मजूर, शेतकरी, भिक्षेकरी, बेघर, मनोरुग्णांना मोठा आधार मिळाला. गतवेळच्या कडक लॉकडाऊनमध्येही या शिवभोजन केंद्राने अनेकांना तृप्त केले. सद्य:स्थितीत कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाला असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कडक संचारबंदी लागू केली. या काळात कोणत्याही गरजवंताची परवड होऊ नये, यासाठी सरकारने शिवभोजन थाळीच्या कोट्यात दीडपट वाढ केली आहे. याअंतर्गत शनिवार, १७ एप्रिलपासून शहरातील केंद्रावरून वाढीव थाळ्यांचे मोफत वाटप सुरू आहे. शहरातील शिवभोजन केंद्रावर चांगल्या दर्जाचे जेवण दिले जात आहे. दोन पोळी, वरण, भात आणि एक भाजी, असा मेनू आहे. कोरोनामुळे या केंद्रावरून पार्सलद्वारे थाळीचे वाटप सुरू आहे. यासाठी सकाळी ११ ते ४ हा वेळ निर्धारित असला तरी दुपारी २ वाजेपर्यंतच केंद्रावरील थाळी संपतात. थाळीचा लाभ घेणाऱ्यांना विठ्ठल जगदाळे यांच्याद्वारे कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी मास्कचे वाटप करण्यात येत आहे.
१९० जणांची भागविली जाते भूक !
येथील शिवभोजन केंद्राला यापूर्वी १२५ थाळी वाटपाचा कोटा होता. त्यात शनिवारपासून वाढ झाल्याने गत दोन दिवसांपासून १९० थाळ्यांचे वाटप या केंद्रावरून सुरू आहे. १ एप्रिल २०२० पासून या केंद्रावरून ४५ हजार ३४ थाळ्यांचे वाटप करण्यात आले आहे.
आधी १२५ थाळ्यांचा कोटा होता. त्यात वाढ झाल्याने शनिवार व रविवारी प्रतिदिन १९० थाळ्यांचे वाटप केले. यापूर्वी कोटा संपल्यानंतरही कोणी उपाशीपोटी परतू नये, यासाठी अतिरिक्त थाळ्यांचे वाटप करत होतो. त्यात वाढ झाल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. सध्या मोफत थाळी मिळत असल्याने निर्धारित कोटा हातोहात संपत आहे.
नीलेश अंजनकर,
शिवभोजन केंद्रप्रमुख, चिखली.