आजच्या बाजारभावाप्रमाणे जमिनीचा आम्हाला मोबदला देण्यात यावा..
लोणार : सरोवर परिसरातील इजेक्टा ब्लँकेटच्या जतनासाठी नागपूर खंडपीठाच्या निर्देशानुसार लोणारमधील शेतकऱ्यांची ८६ हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे; पण शेतकऱ्यांना पूर्वकल्पना न देताच शेतजमिनीची मोजणी केली जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष आहे. त्यातच सध्या शेतात पिके असल्याने त्यांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
भूमी अभिलेख कार्यालयामार्फत ही जमीन मोजणीचे काम सध्या सुरू आहे. त्यासाठी तीन सदस्यीय पथकही तालुका भूमी अभिलेख कार्यालयाने स्थापन केले असून, ईटीएस मशीनद्वारे या जमिनीची मोजणी सुरू केली आहे. मात्र, काही शेतकऱ्यांना भूमी अभिलेख कार्यालयाने पाठविलेल्या नोटीस मिळाल्या आहेत, पण काही शेतकऱ्यांना त्या मिळालेल्या नाहीत. त्यामुळे पूर्वकल्पना न देताच जमिनीची मोजणी सुरू करण्यात आली असल्याची शेतकऱ्यांची ओरड आहे.
त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात येणार आहेत, त्यांना संबंधित विभागाने विश्वासात घेऊन कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी शेतकरीवर्ग करत आहेत. दरम्यान, परिसरातील काही शेतकऱ्यांकडे ओलिताची जमीन आहे. फळबागही आहे. त्यानुषंगाने आजच्या बाजारभावाप्रमाणे शेतकऱ्यांच्या जमीन घेतल्या जाव्यात. सोबतच शेतीचे कायदेशीर सीमांकन करून वर्तमानस्थितीत शेतात असलेल्या फळबाग व इतर नगदी पिकांचे नुकसान होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी, अशी मागणी भीमराव मापारी व परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.