सिंदखेडराजा : समृद्धी महामार्गावरील खासगी बस अपघाताची घटना अत्यंत गंभीर आहे. ‘समृद्धी’वरील वाढते अपघात लक्षात घेता यंत्रणा कामाला लागली आहेत. भविष्यात अपघात होऊ नयेत, याअनुषंगाने सरकारकडून उपाययोजना करण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १ जुलै रोजी दुपारी १२:३५ वाजता समृद्धी महामार्गावर पिंपळखुटानजीक अपघाताच्या घटनास्थळावर दिली. मृतकांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत घटनास्थळावर येण्यापूर्वीच त्यांनी जाहीर केली होती.
समृद्धी महामार्गावर पिंपळखुटानजीक १ जुलै रोजी पहाटे १:३० वाजेदरम्यान झालेल्या खासगी बसच्या अपघातामध्ये २५ जणांचा मृत्यू झाला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १२:३५ वाजता घटनास्थळावर भेट दिली. घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकाऱ्यांसह पोलिस यंत्रणा व इतर अधिकाऱ्यांना अपघातातील जास्तीत जास्त लोकांचे जीव वाचविण्याच्या सूचना दिल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. आतापर्यंत समृद्धी महामार्गावर झालेले जास्तीत तास्त अपघात हे वाहनचालकांच्या चुकांमुळे झाले आहेत. प्रवासी सुरक्षित ठिकाणी पोहोचविणे ही वाहनाचे मालक आणि चालकाचीसुद्धा जबाबदारी आहे. बऱ्याच वेळा चालकाला डुलकी आल्याने अपघात घडत आहेत. या अपघातांतही हेच निदर्शनास येत आहे; परंतु अद्याप चौकशी सुरू आहे. सरकारला या घटनेचे गांभीर्य आहे, चालकांनीसुद्धा नियमांचे पालन केले पाहिजे, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. घटनास्थळावर अग्निशमन किंवा इतर सर्व यंत्रणा वेळेवर पोहोचली; परंतु बसचे दरवाजे बंद झाल्याने २५ लोकांना वाचविता आले नाही. अपघात होऊ नये, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री संदीपान भुमरे, अतुल सावे, खा. प्रतापराव जाधव, आ. संजय रायमूलकर, आ. श्वेता महाले, माजी आ. शशिकांत खेडेकर आदींची उपस्थिती होती.
घटना अत्यंत वेदनादायी : उपमुख्यमंत्रीसमृद्धी महामार्गावरील हा अपघात अत्यंत दुर्दैवी आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्व यंत्रणा काम करीत आहे. यात २५ प्रवाशांचा मृत्यू झाला असून, ही घटना अत्यंत वेदनादायी असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.