बुलडाणा : नीट न देता, बारावीच्या गुणांच्या आधारावर मेडिकलला प्रवेश देण्याचा निर्णय तामिळनाडू शासनाने घेतला आहे. या निर्णयाविषयी शिक्षकांनी संमिश्र तर विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेच्या माध्यमातूनच वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश झाले पाहिजेत, अशा प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत. नीट नसेल तर गुणवंत विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली.
कोरोनामुळे यंदा राज्यात इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षा झाल्या नाहीत. अंतर्गत मूल्यमापन व नववी, दहावी, अकरावी व बारावीत मिळालेल्या अंतर्गत परीक्षांमध्ये गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात आले. रविवारी नीटची परीक्षा पार पडली. या परीक्षेपूर्वी तामिळनाडू राज्यातील एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. केंद्राची नीट परीक्षा नको, अशी तेथील विद्यार्थी, पालक व शासनाने मागणी केली आणि नीट परीक्षेतून विद्यार्थ्यांना सूट देणारे विधेयक मांडले. या विषयावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही शिक्षकांनी, नीट परीक्षा हवीच. केवळ बारावीतील गुणांच्या आधारे वैद्यकीय प्रवेशाचा विचार होऊ नये तर काहींनी बारावीत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र विषयात मिळालेल्या गुणांच्या आधारे वैद्यकीय प्रवेश द्यायला काही हरकत नसल्याचे मत व्यक्त केले. मात्र, विद्यार्थ्यांनी याउलट मत केले आहे. विद्यार्थी म्हणतात की, नीट, सीईटी परीक्षेच्या माध्यमातूनच वैद्यकीय प्रवेश झाले पाहिजेत. यंदा कोरोनामुळे बारावीची परीक्षा झाली नाही. अंतर्गत मूल्यमापन करून भरमसाट गुण देण्यात आले. निकालाची टक्केवारी वाढली.
अशातच बारावीतील गुणांच्या आधारे वैद्यकीय प्रवेश दिले. गुणवंत व सक्षम विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची भीती वाटते.
...............प्रतिक्रिया.............
विद्यार्थी काय म्हणतात...
नीट परीक्षेमध्ये स्टेट बोर्डापेक्षा अकरावी, बारावीचा अभ्यासक्रम समाविष्ट असतो. नीट परीक्षेमुळे गुणवत्ता असलेल्या विद्यार्थ्यांची निवड होते. नीट परीक्षेच्या माध्यमातूनच वैद्यकीय प्रवेश व्हावेत. - महेश देशमुख, विद्यार्थी.
बारावीतील गुणांच्या आधारे वैद्यकीय प्रवेश नकोच. नीट परीक्षेच्या माध्यमातूनच वैद्यकीय प्रवेश मिळावेत. या परीक्षेच्या माध्यमातूनच गुणवंत विद्यार्थी मेडिकलला जातील. बारावीच्या आधारे वैद्यकीय प्रवेश दिले तर गुण आणि आरक्षणाचा गुणवंत विद्यार्थ्यांना फटका बसेल.
- वैशाली इंगळे, विद्यार्थिनी
काय आहे तामिळनाडू सरकारचा धक्कादायक निर्णय?
नीट परीक्षा होण्याच्या आधी तामिळनाडू राज्यातील एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. त्यामुळे केंद्राची नीट परीक्षा नकोच, अशी भूमिका तामिळनाडू राज्यातील विद्यार्थी, पालक व तेथील सत्ताधारी सरकारने घेतली. नीट परीक्षेतून राज्यातील सूट देणारे विधेयक तामिळनाडू सरकारने विधानसभेत मांडले आणि संमतही केले. त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेशासाठी नीट परीक्षा देण्याची गरज नाही. या विधेयकाद्वारे विद्यार्थ्यांना नीट परीक्षेतून सूट मिळण्याची मागणी तामिळनाडू सरकारने केली आहे.
..............प्रतिक्रिया.....................
शिक्षणतज्ज्ञ काय म्हणतात...
पूर्वी बारावीतील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र विषयात मिळालेल्या गुणांच्या आधारे वैद्यकीय प्रवेश देण्यात येत होते. स्पर्धात्मक परीक्षा नव्हती. नीट व इतर परीक्षांच्या माध्यमातून वैद्यकीय प्रवेश देणे सुरू झाले ते योग्यच झाले. या वर्षी बारावी परीक्षा न झाल्याने या वर्षी नीट परीक्षे वरच प्रवेश द्यावेत. नीट परीक्षा आवश्यक आहेच, परंतु बारावी परीक्षेतील गुणांच्या आधारे वैद्यकीय प्रवेश झाले तर योग्य ठरणार नाही. गुणवंत विद्यार्थ्यांचे नुकसान व्हायला नको.
-कॅप्टन डाॅ़ प्रशांत काेठे, प्राचार्य,जिजामाता महाविद्यालय बुलडाणा
नीट लागू झाली तेव्हापासून तामिळनाडू सरकार विरोध करीत आहे. सीईटी व्हायची तेव्हा राज्यापुरती स्पर्धा व्हायची. नीटमुळे देशभरात विद्यार्थ्यांच्या संधी वाढल्या. १५ टक्के जागा विद्यार्थ्यांच्या वाढल्या, नीट परीक्षेमुळे आता सीईटी, एआयआयएमएस, जेआयपीएमडआर, एआयपीएमटी या परीक्षा द्याव्या लागत नाहीत. विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून नीट परीक्षाच योग्य आहे.
-संजय खांडवे, शिक्षणतज्ज्ञ.