बुलडाणा: लोकसभा निवडणूकीसाठी प्रशासन सज्ज असून मतदान केंद्रावर वैद्यकिय सहाय्यकही देण्याबाबत आयोगाने सुचीत केले आहे. दरम्यान, पिण्याच्या पाण्यासह मतदानाच्या दिवशी वीज पुरवटा खंडीत होणार नाही, याची काळजी घेण्यात यावी. सोबतच दिव्यांग मतदारांसाठी व्हील चेअरचीही सुविधा उपलब्ध करण्यात यावी, अशा महत्त्वाच्या सुचना अमरावती विभागीय आयुक्त पियुष सिंग यांनी २२ मार्च रोजी दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात लोकसभा निवडणूक २०१९ च्या तयारीचा आढावा एका बैठकीत घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन एस., उपजिल्हाधिकारी (निवडणूक) गौरी सावंत, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.निवडणुकींच्या अनुषंगाने सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावीत, असे ही विभागीय आयुक्तांनी स्पष्ट केले. निवडणूकीच्या अनुषंगाने व्हीव्हीपॅटचे प्रात्याक्षिक तथा प्रशिक्षणही गांभिर्यपूर्वक दिल्या जावे, असे ही त्यांनी स्पष्ट केले. मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीनेही मतदान जागृती कार्यक्रम सुरू ठेवावे. यावेळेस निवडणूक आयोगाने मतदार चिठ्ठी ही मतदार ओळखपत्र गृहीत धरण्यात येवू नये, अशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे मतदानावेळी मतदारांनी मतदार चिठ्ठी ओळखीचा पुरवा म्हणून आणू नये. प्रत्येक मतदाराने निवडणूक ओळखपत्र सोबत ठेवावे. मतदान केंद्रावर संदेश वहन व्यवस्था अगदी चोख ठेवावी. मतदानाची नियमित टक्केवारीची माहिती पाठवावी. मतदान केंद्रामध्ये व्हिव्हिपॅट मशीनवर कुठल्याही प्रकारे उष्णता वाढविणारे साधन ठेवू नये. विजेचा बल्बही मशीनवर येणार नाही, याबाबत काळजी घ्यावी.
मतदानावेळी पुरावा म्हणून ही ओळखपत्रे चालतीलमतदार चिठ्ठी ही ओळखीचा पुरावा म्हणून चालणार नाही. प्रत्येक मतदाराने निवडणूक ओळखपत्र सोबत आणावे. ते नसल्यास त्याऐवजी पासपोर्ट, वाहन चालक परवाना, राज्य/केंद्र/पीएसयु/पब्लीक लिमिटेड कंपन्यांद्वारे कर्मचार्यांना जारी केलेल्या फोटोसह ओळखपत्र, बँक व पोस्ट आॅफीसद्वारे जाही केले फोटो ओळखपत्र, पॅन कार्ड, एनपीआरद्वारे जारी केलेले स्मार्टकार्ड, मनरेगाचे जॉब कार्ड, श्रम मंत्रालयाच्या योजनेतंर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड, छायाचित्र असलेले पेन्शन दस्तऐवज, सांसद सदस्य/ विधान सभा किंवा विधान परिषद सदस्य यांना जारी केलेले अधिकृत ओळखपत्र व आधार कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून मतदानासाठी ग्राह्य धरण्यात येणार असल्याचेही यावेळी विभागीय आयुक्तांनी आढावा बैठकीत स्पष्ट केले.