बुलढाणा : येथील स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन पांडुरंग वासेकर यांना ४८ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने २३ डिसेंबरला सायंकाळी धाड नाका परिसरात रंगेहात पकडले.
या कारवाईमुळे बुलढाण्यातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. येथील जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याने तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये बजावलेल्या कर्तव्याचे सहा लाख रुपये तक्रारदार कर्मचाऱ्यास प्राप्त झाले होते. दरम्यान तक्रारदाराच्या लावण्यात आलेल्या ड्यूटीवरून निघालेल्या एकूण सहा लाख रुपयांच्या देयकाच्या ८ टक्के प्रमाणे ४८ हजार रुपयांची मागणी डॉ. वासेकर यांनी केली होती. त्यानुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संबंधित कंत्राटी कर्मचाऱ्याने तक्रार केली होती.
त्यानुषंगाने २२ डिसेंबरला लाच मागणीची पडताळणी करण्यात आली होती. त्यात अनुषंगीक रक्कम डॉ. वासेकर यांनी मागितली असल्याचे स्पष्ट झाले होते. दरम्यान २३ डिसेंबर रोजी प्रकरणात सापळा रचण्यात आला. त्यात डॉ. सचिन वासेकर यांना तक्रारदाराकडून ४८ हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने धाड नाका परिसरात रंगेहात पकडले. प्रकरणी बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस उपअधीक्षक शीतल घोगरे, एसएसआय श्याम भांगे, पोलिस हेडकॉन्स्टेबल विलास साखरे, प्रवीण बैरागी, मोहम्मद रिजवान, राजू क्षीरसागर, विनोद लोखंडे, जगदीश पवार, गौरव खत्री, शैलेश सोनवणे, स्वाती वाणी, अर्शद शेख यांनी केली.