विवेक चांदूरकरलोकमत न्यूज नेटवर्क बुुलडाणा : अखील भारतीय मराठी साहित्य संमेलन हे दिल्ली किंवा हिवरा आश्रम येथे होण्याची शक्यता आहे. सदर संमेलन हे दिल्लीला झाले तर तो केवळ एक इव्हेंट असेल मात्र हिवरा आश्रम येथे झाले तर त्याला खरा रसिकाश्रय मिळेल, त्यामुळे सदर संमेलन हे महाराष्ट्रातच व्हावे, अशी अनेक साहित्यिकांची इच्छा आहे.अखील भारतीय साहित्य संमेलनाची स्थळ निश्चिती दहा सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे. संमेलनाकरिता दिल्ली, बडोदा आणि हिवरा आश्रम येथील प्रस्ताव आले आहेत. त्यापैकी दिल्ली व बडोदा येथील स्थळ पाहणी झाली असून, हिवरा आश्रम येथील स्थळपाहणी ९ सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे. त्यानंतर संमेलन कोठे घ्यायचे, याची घोषणा करण्यात येणार आहे. अखील भारतीय मराठी साहित्य संमेलन हे महाराष्ट्रातच व्हावे, अशी इच्छा अनेक साहित्यिकांनी व्यक्त केली आहे. विश्व साहित्य संमेलन हे विदेशात किंवा परराज्यात घ्यायला हवे. मात्र, मराठी जनांच्या अस्मिता जुळल्या असलेले हे संमेलन अन्य राज्यात घेवू नये असा सूर आता उमटत आहे. दिल्ली येथे संमेलन झाले तर तेथे सामान्य किंवा ग्रामीण भागातील साहित्यिक जाणार नाही. तेथे मराठी श्रोते मिळणार नाही. किंवा अधिकारी किंवा कार्यकर्त्यांचा बडेजाव असेल. मोठे नेते संमेलनाला आले तर संमेलनाचा मुळ उद्देश साध्य होणार नाही, अशी प्रतिक्रिया साहित्यिकांनी दिल्या आहेत. घुमान येथे पार पडलेल्या साहित्य संमेलनात असा अनुभव आला आहे. याबाबत मत व्यक्त करताना साहित्यिक प्रतीमा इंगोले म्हणाल्या, की संमेलन हे महाराष्ट्रातच व्हायला हवे. दिल्लीत झाले तर त्याचा फायदा मराठी माणसांना होणार नाही. हिवरा आश्रम येथे झाले तर ग्रामीण साहित्यिकांना त्याचा फायदा होणार आहे. पुस्तकांचे प्रदर्शन लागले तर ग्रामीण भागातील नागरिकांना त्याचा लाभ घेता येईल. दिल्लीत नेहमीच पुस्तकांचे प्रदर्शन असते. ग्रामीण भागातील नागरिकांना त्याचा जास्त फायदा होईल. तसेच प्रसिद्ध संचालनकर्ते, कवि अजिम नवाज राही म्हणाले, की संमेलन हे बुलडाणा जिल्ह्याला ना. घ. देशपांडे पासून तर सदानंद देशमुखांपर्यंत मोठी साहित्य परंपरा लाभली आहे. त्यामुळे सदर संमेलन हे हिवरा आश्रम येथे व्हायला हवे. संमेलन हिवरा आश्रमला झाले तर हा जिल्हयाचा सन्मान असेल.
सध्याची परिस्थिती पाहता अखील भारतीय मराठी साहित्य संमेलन हे महाराष्ट्रातच व्हायला हवे. बुलडाणा जिल्ह्याला मोठी साहित्य परंपरा लाभली आहे. त्या तुलनेत जिल्ह्यावर अन्यायच झाला आहे. अखील भारतीय संमेलन झाले तर जिल्ह्याला मोठा मान मिळेल. -प्रदीप निफाडकर, साहित्यिक,पुणे
अखील भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि विश्व साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते. त्यापैकी विश्व मराठी साहित्य संमेलन हे महाराष्ट्राबाहेर झाले तर ठिक आहे. मात्र, अखील भारतीय मराठी साहित्य संमेलन तर महाराष्ट्रातच व्हायला हवे. अन्य राज्यात संमेलन झाले तर खूप कमी साहित्यिक जातात. सरकारनेही कुणा कुणाचा भार उचलायचा. त्यापेक्षा हिवरा आश्रम येथेच संमेलन व्हायला हवे.- बाबाराव मुसळे, साहित्यिक, वाशिम
साहित्य संमेलन हे महाराष्ट्रातच व्हायला हवे. संमेलन ज्या ठिकाणी असते, त्या परिसरातील कवी, लेकख, नवोदित साहित्यिक संमेलनात हिरीरीने सहभाग घेतात. नवीन लोक जुळतात. संमेलनाला भरगोस रसिक मिळतात. दिल्लीत झाले तर तेथील पिकनिकसाठी आलेले मराणी माणसे व पैसे देवून नेण्यात आलेल्या साहित्यिकांव्यतिरिक्त कुणीही येणार नाही.- सुरेशकुमार वैराळकर, प्रसिद्ध शाहीर
अखील भारतीय साहित्य संमेलन हे महाराष्ट्रातच व्हायला हवे. दिल्लीत केवळ एक ईव्हेंट होईल. त्याला रसिकाश्रय मिळणार नाही. हिवरा आश्रम येथे साहित्य संमेलन आयोजित करण्याकरिता संपूर्ण व्यवस्था आहे. येथे दरवर्षी मोठे संमेलनही आयोजित करण्यात येतात. तसेच महाराष्ट्रात संमेलन झाले तर मराठी श्रोत्यांची गर्दी ओसंडून वाहेल. दिल्लीतील चित्र वेगळे असेल- नरेंद्र लांजेवार, साहित्यिक, बुलडाणा