देऊळगाव राजा व परिसरातून श्री बालाजी महाराज संस्थानचे वंशपारंपरिक विश्वस्त राजे विजयसिंह जाधव व इतर मराठा बांधव उपस्थित होते. मराठा क्रांती मोर्चा, पुणे जिल्हा यांच्या वतीने आयोजित या राज्यव्यापी सभेची सुरुवात खासदार छत्रपती संभाजी राजे यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून झाली. या सभेमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. यामध्ये कोपर्डी घटनेतील दोषींना लवकरात लवकर शिक्षा देण्यात यावी, ही मागणी लावून धरण्याचे ठरविण्यात आले. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ मिळण्याविषयी व यासंबंधी इतर प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. एसईबीसी अंतर्गत नियुक्त्यांविषयी, सारथी या संस्थेविषयी, आरक्षणासाठीची १०२ वी घटनादुरुस्ती या महत्त्वाच्या विषयावरही या सभेमध्ये चर्चा घडून आली. मराठा आरक्षण आंदोलनात ज्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यापैकी किती गुन्हे मागे घेण्यात आले याचा आढावा घेण्यात आला. उर्वरित गुन्हेही मागे घेण्यासंदर्भात पाठपुरावा करण्याचे ठरले. मराठा समाजासोबतच इतर बहुजन समाजाच्या प्रश्नांवरसुद्धा काम करण्याचे ठरले. या सभेमध्ये टोकियो ऑलिम्पिकमध्ये १३ वर्षांनी भारताला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्राचे अभिनंदन करून त्याच्या कौतुकाचा ठराव पारित करण्यात आला. तसेच त्याचा सत्कार करण्याचे ठरले. या सभेमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी उच्चतम कामगिरी करणाऱ्या इतर खेळाडूंचेदेखील अभिनंदन करण्यात आले.
मराठा क्रांती मोर्चाची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 4:39 AM