मेहकर पुरवठा विभागामध्ये अनेक दिवसांपासून गलथान कारभार सुरू असल्याच्या तक्रारी आमदार रायमुलकर यांच्याकडे येत होत्या. अनेक दुकानदारांकडून या विषयावर ओरड होत होती. ९ आगस्ट रोजी तहसील कार्यालयाच्यावतीने दक्षता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या सभेमध्ये पुरवठा विभागाचा विषय ऐरणीवर आला असता, धक्कादायक बाब समोर आली की, मेहकर धान्य गोडाऊनमधून दुकानदारांना महिन्याच्या २५ तारखेनंतर धान्य वितरित होते. या कारणाने रेशन धान्य दुकानदार सामान्य नागरिकांना धान्य वाटप करायचे तरी कसे? असा मोठा पेच प्रसंग रेशन दुकानदारांसमोर अनेक महिन्यापासून येत होता. द्वारपोच योजनेच्या माध्यमातून कंत्राटदार धान्य गोडाऊनमधून थेट दुकानदाराच्या दारापर्यंत माल पोहोचवतो. परंतु दहा रुपये क्विंटलप्रमाणे त्या दुकानदाराला हमाली द्यावी लागते. शासनाच्या नियमानुसार द्वारपोच योजना घरापर्यंतची आहे. मग पैसे कशाला द्यायचे असा सवाल रेशन दुकानदार संघटनेच्यावतीने आमदार रायमुलकर यांच्या समोर मांडण्यात आला.
विभक्त रेशनकार्ड मिळत नसल्याची तक्रार
मेहकर तालुक्यामध्ये रेशन कार्ड विभक्त करायचे असेल तर एक हजार रुपये या दराने पैसे दिल्यास ते पंधरा दिवसांत तयार करून मिळते. तर पैसे न देणाऱ्याचे एक वर्ष रेशन कार्ड विभक्त होत नाही. अशाप्रकारे अनेक सेतू धारक सामान्य नागरिकांना लुटत असल्याच्या तक्रारी येत आहेत. तरीसुद्धा महसूल प्रशासन अशा सेतू चालकांवर कारवाई का करत नाही असा गंभीर सवाल आमदार डॉ. रायमुलकर यांनी दक्षता समितीच्या बैठकीमध्ये अधिकाऱ्यानांच विचारला. यावर अधिकाऱ्यांना उत्तर देता आले नाही.
आठ दिवसांत प्रलंबित प्रस्ताव मार्गी लावू
सेतू चालकांना नोटिसा देऊनसुद्धा सेतू चालकांनी त्यांच्याकडील पेंडिंग असलेल्या शिधापत्रिका तहसील कार्यालयामध्ये आणून दिल्या नाही. आठ दिवसांमध्ये संपूर्ण सेतू चालकांकडून पेंडिंग प्रकरण तहसीलच्या माध्यमातून मार्गी लावा. जे सेतू चालक सामान्य नागरिकांची लूट करत असतील त्यांच्यावर कडक कारवाई करून त्यांचे सेतू सुद्धा बंद करा असे निर्देश आमदार डॉ. रायमुलकर यांनी दक्षता समितीमध्ये तहसीलदार डॉ. संजय गरकल व पुरवठा निरीक्षक यांना दिले.
आमदारांचा सत्कार
दक्षता समितीची सभा सुरू होण्यापूर्वी रेशन दुकानदार संघटनेच्यावतीने अध्यक्ष विनोद देशमुख यांनी आमदार रायमुलकर यांचे शाल, श्रीफळ देऊन स्वागत केले. उत्कृष्ट तहसीलदार म्हणून गौरविण्यात आलेले डॉ. संजय गरकल यांचे शाल, श्रीफळ देऊन स्वागत केले. यावेळी रेशन दुकानदार संघटनेचे माजी अध्यक्ष डी. आर. वानखेडे, जिल्हा उपाध्यक्ष विष्णुपंत पाखरे हे उपस्थित होते.