गिरीश राऊत / खामगाव: प्रशासकीय कामकाज आणि नागरी सुविधांच्या दृष्टीने महावितरण कंपनीच्या खामगाव येथील उपविभागीय कार्यालयाचे विभाजन करून मेहकर हा स्वतंत्र विभाग करण्यासंदर्भातील प्रस्ताव महावितरणच्या मुख्य कार्यालयात एक वर्षापासून प्रलंबित आहे. दरम्यान, २ फेब्रुवारी रोजी आकोट येथील विभागास मंजुरी देण्यात आल्याने मेहकर विभागाचा प्रश्नही सध्या ऐरणीवर आला आहे. प्रशासकीय सुविधा आणि नागरी सेवा देताना कामाचा दर्जा अधिकतम असावा, या दृष्टिकोणातून हा प्रस्ताव उपयुक्त असून, त्या दृष्टीने आता हालचाल होण्याची गरज निर्माण झाली आहे. मेहकर विभागाचा प्रस्ताव हा आकोट कार्यालयाच्या आधीचा असल्याने त्याबाबत निर्णय व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. नाही म्हणायला प्रशासकीय सुविधेच्या दृष्टिकोणातून अनेक कार्यालयांचे विभाजन होत असते तसे हे व्हावे, ही अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. महावितरणच्या खामगाव येथील उपविभागीय कार्यालयांतर्गत खामगाव शहर, खामगाव ग्रामीण, शेगाव, संग्रामपूर, मेहकर व लोणार असे सहा विभाग कार्यरत आहेत; मात्र भौगोलिकदृष्ट्या विचार करता मेहकर व लोणार हे दोन्ही तालुके काहीसे अडचणीचे ठरतात. या भागाचे कार्यालय खामगाव येथे असल्याने कार्यालयीन बैठकी व इतर कामकाज यासाठी शाखा अभियंत्यासोबतच इतर कर्मचारी, सोबतच तक्रारी, नवीन मीटर जोडणी व इतर संबंधित कामकाजानिमित्त खामगाव येथे यावे लागते तसेच नवीन रोहित्र बसविणे, वीजवाहिनी साहित्य ने-आण करणे आदी कामे करावी लागतात. यासाठी खामगाव परिसरातील शेगाव, संग्रामपूरचे अंतर जास्त नाही. मात्र मेहकर व लोणार तालुक्यातून येणार्यांना सुमारे २00 किलोमीटर येणे व २00 किलोमीटर जाणे असे ४00 किलोमीटर अंतर कापावे लागते. त्यामुळे प्रशासकीय कामकाजाचा खोळंबा होण्यासोबतच आर्थिक भुर्दंडही प्रशासकीय स्तरावर तथा सामान्य नागरिकांना सोसावा लागतो.
मेहकर विभागाचा प्रस्ताव ऐरणीवर!
By admin | Published: February 08, 2016 2:23 AM