मेहकर ते अंत्री देशमुख या ७.६०० कि.मी. रस्त्याच्या दर्जोन्नतीची मंजुरात आ. संजय रायमुलकर यांनी मंत्रालयात वेळोवेळी बांधकाम मंत्र्यांशी संपर्क साधून करून घेतली होती. हा रस्ता शहरातील रामनगर, वडारपुरा, ग्रामीण रुग्णालय व पुढे बायपासला जोडून अंत्री देशमुखकडे जातो. या कामाची वर्क ऑर्डर औरंगाबाद येथील एजन्सीला ८ मार्च २०१९ ला देण्यात आली होती. काम पूर्ण करण्याची मुदत ७ डिसेंबर २०१९ होती. या कालावधीत काम पूर्ण झाले नाही. तेव्हा या एजन्सीला पून्हा ३१ मार्च २०२० पर्यंत मुदतवाढ मिळाली. परंतु, काम पूर्ण झालेच नाही. आतातर मुदत वाढीचा कालावधी संपून ११ महिने झाले, तरीही काम झाले नाही. या विलंबाबाबत कार्यकारी अभियंता, बुलडाणा यांनी दंड आकारणी केली आहे. पुन्हा मुदतवाढ मिळावी म्हणून एजन्सीचा प्रस्ताव मुख्य अभियंता, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, मुंबई कार्यालयाकडे पडून आहे. तेव्हा मुंबई कार्यालय या दिरंगाईबद्दल काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. सध्या बसस्थानक ते रामनगर पर्यंतचे अतिक्रमण हटविण्यात आले आहे. बसस्थानकापासून ५७५ मीटर लांबीचा रस्ता सिमेंट काँक्रीटचा होणार आहे. तो ७ मीटर रुंदीचा आहे. पुढील अंत्री देशमुख पर्यंतचा रस्ता साडेपाच मीटर रुंदीचा डांबरीकरण आहे. सध्या रस्त्याचे काम धिम्या गतीने सुरू आहे. त्यामुळे मुख्य अभियंता हे काम पूर्ण करण्यासाठी या एजन्सीला किती मुदत देतात याकडे मेहकरवासीयांचे लक्ष लागले आहे.
बाॅक्स........
२०० मीटरचा रस्ता होणार
शिवसेना कार्यालय ते रामनगर हा मे. ए. सो. हायस्कूल मागील रस्ता व आडवा सार्वजनिक बांधकाम अभियंता निवासस्थानपर्यंतचा २०० मीटर डांबरी रस्तासुद्धा याच रस्त्याच्या सोबत होणार आहे.