मेहकर : भूमी सुपोषण ही जनचळवळ व्हावी. ती आजच्या काळाची गरज आहे, असे विचार स्वदेशी जागरण मंचाचे जिल्हा सहसंयोजक हर्षल सोमण यांनी मांडले.
वर्षप्रतिपदा हा वसुधा निर्मितीचा प्रथम दिवस असल्याने त्यानिमित्ताने भूमातेच्या पूजनाचे विविध कार्यक्रम कोविडच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आले होते. आपापल्या शेतांमध्ये शेतकरी बांधवांनी भूमातेचे पूजन केले. त्यानंतर ऑनलाईन मार्गदर्शन करताना हर्षल सोमण बोलत होते.
शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळले पाहिजे. जैविक शेती करून जमिनीचा कस कसा वाढेल, याची काळजी घेणे आवश्यक आहे. रासायनिक शेतीमुळे जमिनीचा कस कमी झाला आहे. त्यामुळे ही परिस्थिती रोगराईला आमंत्रण देणारी ठरली आहे. भूमी सुपोषण अभियानाची आवश्यकता निर्माण झाली आहे. आपल्या संस्कृतीप्रमाणे पृथ्वी ही आपली माता आहे. आपण तिचे पुत्र आहोत. आपल्या मातेचे शोषण आपल्याकडून होता कामा नये. पाश्चात्त्य विचार हा शोषणाचा आहे. तर भारतीय विचार हा दोहनाचा आहे. आपण आपल्या भूमातेकडून आवश्यक तेव्हढेच घेऊ आणि तिचे पोषण करू हा संकल्प या निमित्ताने सर्वांनी करावा असे आवाहन यावेळी हर्षल सोमण यांनी केले. या कार्यक्रमात मेहकर येथे हर्षल सोमण यांनी त्यांच्या शेतात भूमातेचे सपत्नीक पूजन केले. लोणार तालुक्यात बिबी येथे अरविंद चव्हाण यांनी शेतात तलावातील गाळ उपसून टाकून भूमी सुपोषण व पूजन कृतियुक्त केले. अंत्री देशमुख या गावी देशमुख यांनी जैविक खतांसोबत भूमिपूजन केले. सिंदखेडराजा तालुक्यात साखरखेर्डा येथे सीताराम काळे यांनी गोमातेसह भूमिपूजन केले. तर रायपूर येथे शिवप्रसाद थुट्टे यांनी कुंटुंबीयासोबत भूमिपूजन केले. या सर्व ऑनलाईन कार्यक्रमाचे नियोजन व प्रास्ताविक स्वदेशी जागरण मंचाचे जिल्हा सहसंयोजक पंकज किंबहुने यांनी केले.