कोरोनामुळे खरबदारी: उत्सवाचे आयोजक गुरूपिठाधिशांचा निर्णयबुलडाणा: मेहकर येथे साजरा होणारा नृसिंह नवरात्रोत्सवाला धार्मिक परंपरेचा मोठा वारसा लाभलेला आहे. याठिकाणी राज्यभरासह इतर राज्यातूनही काही भक्तवर्ग उत्सवासाठी येत असतात. जागतिक ख्याती असलेल्या मेहकरच्या अकरापैकी सहाव्या नृसिंह मंदिरातील साडेचारशे वर्षांची परंपरा असलेला नवरात्रोत्सव स्थगित करण्यात आला आहे. परंतू कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे ही पंरपरा यंदा प्रथमच खंडीत होणार आहे. गीतेच्या अकराव्या अध्यायात उल्लेख असलेले मेहकरचे नृसिंह मंदिर हे जगातील पुराण-प्रसिद्ध अकरापैकी सहावे असल्यामुळे दूरवरून लोक दर्शनासाठी येथे येतात. पाकिस्तानातल्या मुलतान येथे अवतार घेतल्यानंतर नरसिंहाने भक्त प्रल्हाद व लक्ष्मीसह मेहकर येथे भोजन केले होते, अशी पौराणिक आख्यायिका आहे. अजूनही अस्तित्वात असलेल्या हेमाडपंती भुयारातून श्रीमूर्तीची मंदिरात प्रतिष्ठापना केल्यानंतर १५६९ सालापासून हा नवरात्रोत्सव अव्याहत सुरू आहे. दरवर्षी या उत्सवात हजारो भक्त दर्शनासाठी गर्दी करतात. यावर्षी २९ एप्रिल ते ८ मे या कालावधीत हा नृसिंह नवरात्रोत्सव आहे. मात्र कोरोनाच्या साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विद्यमान पीठाधीश अॅड. पितळे महाराज यांनी हा धाडसी निर्णय घेतला आहे. यादरम्यान मंदिर भाविकांसाठी बंद राहणार आहे. या नवरात्रोत्सवातील गर्भगृहातील पूजाविधी व इतर अनुषंगिक कर्मकांडे वगळता दैनंदिन कीर्तन, महाआरती, सामुहिक हरिपाठ, काकडा, सामुहिक उपासना, पंचपदी भजन, काल्याचे कीर्तन, महाप्रसाद, वसंतपूजा आदि कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
‘भाविकांनी घरीच राहून पूजा करावी’कोरोनामुळे प्रत्येकाने दक्षता घेणे आवश्यक आहे. तेव्हा दरवर्षीप्रमाणे या उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी भाविकांनी येऊ नये, घरीच राहून पूजा करावी, असे आवाहन नवरात्रोत्सवाचे आयोजक गुरुपीठाधीश अॅड.रंगनाथ महाराज पितळे यांनी केले आहे. गेल्या ६० वर्षांपासून या मंदिराचे सणवार, उत्सव, नवरात्र, पूजाअर्चा, देवाचा पोशाख आदि जबाबदारी अॅड. रंगनाथ महाराज पितळे यांच्यावर आहे. त्यांच्या पोषाखसेवेला गेल्यावर्षी पाच तपे पूर्ण झाली. १९४० ते १९५९ पर्यंत समर्थ सद्गुरू दिगंबर महाराज यांनी हा वारसा सांभाळला. तर १९६० पासून त्यांनी अॅड. रंगनाथ महाराज यांच्याकडे ही धुरा सोपविली. हा वारसा जपण्यासाठी पीठाधीशांना नऊ दिवसांची गुह्य पद्धतीची पारंपरिक साधना व विशिष्ट अनुष्ठान करावे लागते.