लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर: परिसरात मुदतबाह्य पाकीटबंद गव्हाच्या पिठाची सर्रास विक्री होत असल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांची फसवणूक होत आहे. याकडे अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे लोकमतने १९ डिसेंबर रोजी राबविलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये उघडकीस आले.मेहकर शहरामध्ये बाहेरगावावरून शिक्षण घेण्यासाठी अनेक विद्यार्थी येत असतात, तसेच विविध कामानिमित्त अनेक गोरगरीब महिला- पुरुष येतात. सध्या महागाईचा काळ असल्याने अनेक गोरगरीब नागरिक तथा विद्यार्थी विविध किराणा दुकानावरून पाकीटबंद असलेले पीठ विकत घेतात.
ग्राहकांची फसवणूकमेहकर परिसरातीलकिराणा दुकानात अशा प्रकारचे मुदतबाह्य पाकीटबंद गव्हाच्या पिठाचे पाकीट विक्री होत आहे. अनेक किराणा दुकानात ५ किलो गव्हाचे पिठाचे पाकीट व्रिकीसाठी उपलब्ध होते. त्यापैकी काही दुकानात तीन महिन्याच्या आत पाकिटाची विक्री होत असल्याची माहिती मिळाली; मात्र काही दुकानात तीन-तीन महिने पाकिटे विक्री होत नसल्यामुळे मुदत संपल्यानंतही अशा मुदतबाह्य पाकीटबंद गव्हाच्या पाकिटाची विक्री सुरूच असते. काही किराणा दुकानातून मोठे पाकीट फोडून पीठ विक्री होते. अशावेळी ग्राहक त्या पाकिटावरील मुदत पाहत नाही. अशा प्रकारे अनेक ग्राहकांची फसवणूक होत आहे.
असे राबविण्यात आले स्टिंग ऑपरेशनमुदतबाह्य पाकीटबंद गव्हाचे पीठ विक्री होत असल्याच्या माहितीवरून लोकमत टिममधील तीन सदस्यांनी सकाळी ११ वाजता शहरातील विविध किराणा दुकानात पाकीटबंद गव्हाच्या पीठाची चौकशी केली. यावेळी काही किराणा दुकानातील ५ किलो पिठाच्या पाकिटावर गव्हाचे पीठ पाकिटबंद करण्याची तारीख नमूद केलेली होती. यावेळी पाकिटावर सदर पीठ पाकीटबंद करण्याच्या तारखेपासून तीन महिने वापरण्यास योग्य असल्याचे नमूद असल्याचे दिसून आले; मात्र काही दुकानात पाकिटावरील नमूद तारखेनुसार तीन महिने उलटल्यानंतरही ते पाकीट विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे वास्तव समोर आले. यावेळी टिममधील सदस्यांनी पाकिटाचे फोटो व पाकिटावर नमूद केलेली तारखचे फोटो घेतले. यावरून अनेक किराणा दुकानात मुदतबाह्य पाकीटबंद गव्हाचे पीठ विक्री होत असल्याचे उघडकीस आले.
मुदतबाह्य पाकीटबंद पिठाची विक्री करणे कायद्याने गुन्हा आहे. याबाबत माहिती दिल्यास संबंधित दुकानदारावर कारवाई करण्यात येईल.- गोपाल माहुरे, अन्न व औषध प्रशासन अधिकारी, बुलडाणा