बुलडाणा: विधानसभा निवडणुकीत मेहकर मतदारसंघात शिवसेना, भाजप युतीचे उमेदवार संजय रायमुलकर यांनी विजयाची हॅट्ट्रिक केली आहे. रायमुलकर यांच्या रुपाने शिवसेनेचा प्रतापगड असलेला मेहकर विधानसभा मतदारसंघावर पुन्हा एकदा भगवा फडकला आहे. मेहकर मतदारसंघातील निवडणूक शिवसेना व काँग्रेस अशी दुरंगी होती. या लढतीमध्ये शिवसेनेच्या प्रतिष्ठेचा, तर काँग्रेसच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. मतदारांचा कौल कुणाच्या बाजुने जातो याची उत्सुकता सर्वांना लागली होती. गुरूवारी सकाळी आठ वाजता मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरूवात झाली आणि त्यानंतर शिवसेनेचे संजय रायमुलकर यांनी पहिल्या फेरीपासूनच मतांची आघाडी घेत ती शेवटच्या फेरीपर्यंत कायम ठेवण्याची किमया साधली. सलग तिसºयांदा विजय मिळवितांना त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार अॅड. अनंत वानखेडे यांचा पराभव केला. दुहेरी लढतीतही रायमुलकर यांनी आपला गड कायम ठेवला आहे. मेहकर मतदारसंघात संजय रायमुलकर यांनी १ लाख १२ हजार ३८ मतं मिळविली आहेत. तर काँग्रेसचे अॅड. अनंत वानेखेडे यांना ४९ हजार ८३६ मतांवर पराभवाचा सामना करावा लागला. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे संजय रायमुलकर यांनी ८० हजार ८६१ मते घेऊन त्यावेळी काँग्रेसचे लक्ष्मणराव घुमरे यांचा पराभव केला होता.
मेहकर निवडणूक निकाल : संजय रायमुलकर यांची विजयाची हॅट्ट्रिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 5:38 PM