मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत या वेळेत लसीकरणाची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मनात कोणतीही शंका न बाळगता लसीकरण करावे, तसेच अंतिम व्यक्तीला लस मिळेपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे.
लसीकरणापूर्वी सद्यःस्थितीत आपण कोणती औषध घेत आहोत, याचीही माहिती लसीकरण केंद्रावरील डॉक्टरांना देणे आवश्यक आहे. राज्यात काही दिवसांपासून कोरोना संसर्ग वाढत असल्याने कोरोना लसीकरण करून घेण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे तसेच लसीचे साईड इफेक्ट नसल्याचे सांगून आश्वस्त केले आहे. मात्र, तरीदेखील अनेकांमध्ये लसीबद्दल भीती असल्याचे चित्र पाहावयास मिळते. कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन प्रकारच्या कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध असून ज्यांनी पहिला डोस कोविशिल्डचा घेतला असेल त्यांनी दुसरा डोस ४० ते ४५ दिवसांनी घ्यावा, तसेच ज्यांनी कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला त्यांनी दुसरा डोस हा २८ ते ३० दिवसांनी घ्यावयाच्या असून त्यामुळे शरीरात अँटिबॉडीज तयार होणार आहेत. कोविड १९ विषाणूपासून सुरक्षा मिळणार असून, मनात कोणतीही शंका न बाळगता लसीकरण करावे, असे आवाहन रुग्णकल्याण समिती सदस्य सागर कडभने यांनी केले आहे.