मेहकर येथून एक महिन्यापूर्वी जानेफळ रोडवरील कंचनी महालाच्या जवळ आरोपी आरिफोद्दीन व त्याचे सात साथीदार यांनी ट्रक (क्रमांक एम एच ३८ डी ८९९९) समोर वाहने आडवे लावून ट्रक अडवला होता. त्यानंतर ट्रकचालकाच्या ताब्यातील ट्रक घेऊन आरोपी पसार झाले होते. यासंदर्भात अलीमोद्दीन (रा. हिंगोली, जि. वाशीम) यांच्या फिर्यादीवरून १५ लाख ६० हजाराची जबरी लूट करून वाळू भरलेला ट्रक पळविल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील मुख्य आरोपी आरीफोद्दीन याला मेहकर न्यायालयाने अटकपूर्व जमीन दिला होता. यावर मेहकर पोलिसांनी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार आत्माराम प्रधान यांनी एपीआई युवराज रबडे, पोहेकाँ खालिद खान, पोलिस नायक विजय बेंडवाल यांच्या पथकाने ट्रकचा शोध घेतला. दरम्यान, हा ट्रक आरोपीच्या घरासमोर उभा असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्या वरून मेहकर पोलिसांनी परभणी पोलिसांच्या मदतीने ३ मार्च रोजी हा ट्रक हस्तगत केला. आरोपी आरीफोद्दीन (रा. परभणी) यास मिळालेला अटकपूर्व जामीन मेहकर न्यायालयाकडून रद्द करून घेतला. यातील इतर आरोपींचा मेहकर पोलीस शोध घेत आहेत.
मेहकरातील ट्रक चोरीचे जाळे परभणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2021 4:32 AM