मेहकर : महाराष्ट्र शासनाचा उपक्रम महा आवास अभियानअंतर्गत प्रधान मंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत विविध उपक्रमाच्या माध्यमातून मेहकर पंचायत समितीला प्रथम पुरस्कार मिळाला आहे. यानिमित्त महाराष्ट्र शासन राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण, मुंबई यांनी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून बुलडाणा येथे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते मेहकर पंचायत समितीच्या शिवसेनेच्या सभापती नीताताई दिलीपराव देशमुख व गटविकास अधिकारी आशिष पवार यांना प्रमाणपत्र, ट्राॅफी देऊन गौरविण्यात आले. यावेळी जि.प.अध्यक्षा मनिषा पवार, आ. संजय गायकवाड, जि.प.उपाध्यक्षा कमलताई बुधवत, जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
मेहकर तालुका अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेचे प्रपत्र ब मधील १३९५ लाभार्थीना १०० टक्के घरकुले मंजूर करण्यात आली आहेत़ आजपावेतो १०१६ लाभार्थ्याचे घरकुले शौचालयासह बांधकाम पूर्ण झाले आहे. ३७९ घरकुले प्रगतीत आहेत. तसेच राज्य पुरस्कृत योजनामध्ये १२५३ घरकुले मंजूर असून आज पावेतो ९९२ घरकुले पूर्ण असून २६१ घरकुले बांधकाम प्रगतीत आहेत.
४४१ लाभार्थ्यांना दिली जागा
तालुक्यातील जागा नसलेल्या एकूण ४४१ लाभार्थीना पंडित दीनदयाळ उपाध्याय अर्थसाहाय्य योजना आणि नियनानुकूल करून जागा उपलब्ध करून त्यांना घरकुल मंजूर करण्यात आलेले आहेत. सर्व घरकूल योजने अंतर्गत भूमिहीन लाभार्थ्यांना पंडित दीनदयाल योजना तसेच अतिक्रमण नियमानुकूल करून देऊन १०० टक्के मंजुरी तसेच घरकूल पूर्ण करण्यात मेहकर पंचायत समिती प्रथम आहे. यासाठी अभियान कालावधीत सर्व स्थापत्य अभियांत्रिकी सहायक तसेच ग्रामीण गृह अभियंता ,यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, प्रकल्प संचालक चोपडे तसेच गटविकास अधिकारी आशिष पवार यांचे मार्गदर्शनात घरकुल लाभार्थींना भेटी देऊन त्यांना मार्गदर्शन करून त्यांच्याकडून घरकूल पूर्ण करवून घेतले.