बुलडाणा : घटना समितीचे सदस्य तथा बुलडाणा जिल्ह्याचे तब्बल १६ वर्षे खासदार राहिलेल्या लक्ष्मणराव भटकर यांचे चिखली येथे स्मारक बांधावे, अशी मागणी कास्ट्राइब कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष ॲड. कृष्णा इंगळे यांनी २२ ऑगस्ट राेजी पत्रकार परिषदेत केली़
कृष्णा इंगळे यांनी यावेळी सांगितले की, भारत स्वतंत्र झाल्यानंतर त्यावेळी घटना समिती नेमायची हाेती. त्यासाठी लक्ष्मणराव भटकर हे बुलडाणा जिल्ह्यातून घटना समितीवर निवडून आले हाेते, तर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे बंगालमधून निवडून आले हाेते़ त्यानंतर डाॅ़ बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष झाले़ घटना समितीचे सदस्य असलेल्या लक्ष्मणराव भटकर यांची राज्य घटनेवर स्वाक्षरी आहे़ त्यामुळे एवढा माेठा माणूस हाेेणे हे चिखलीवासीयांच्या भाग्याची गाेष्ट आहे़ त्यानंतर ते खासदार हाेते़ एवढेच नव्हे तर संयुक्त महाराष्ट्रातून महाराष्ट्र वेगळा झाला त्यासाठी नागपूर करार करण्यात आला़ या करारावरही भटकर यांची स्वाक्षरी आहे़ त्यामुळे त्यांचे चिखलीत भव्य स्मारक हाेणे आवश्यक आहे़ त्यासाठी चिखलीचे नगराध्यक्ष तसेच आमदार यांना पत्र लिहिल्याचेही इंगळे यांनी यावेळी सांगितले़
मेव्हणा राजा येथे संत चाेखामेळांचे स्मारक मंजूर
देउळगाव राजा तालुक्यातील मेव्हणा राजा हे संत चाेखामेळा यांचे मूळ गाव. शिवाजीराव माेघे हे समाज कल्याण मंत्री असताना त्यांनी अनुसूचित जाती व नवबाैद्ध घटकांसाठी ऐतिहासिक व सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्व असलेल्या ठिकाणासाठी १ नाेव्हेंबर २०२१ राेजी समिती स्थापन केली हाेती़ त्या समितीचा सदस्य असताना जिल्ह्यातील दाेन स्थळांचा विकास करण्याचे मी सुचवले हाेते़ मेव्हणा राजा येथील संत चाेखामेळांच्या स्मारकासाठी ५१ लाख ८२ हजार ३२४ रुपयांचा निधी मंजूर केला आहे़ लवकरच या स्मारकाचे काम सुरू करण्यात येणार आहे, असेही इंगळे यांनी सांगितले़
पातुर्डा येथील स्मारकासाठी एक काेटीचा निधी
डाॅ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पातुर्डा येथील स्मारकासाठी जवळपास एक काेटी रुपयांचा विकास निधी मंजूर करण्यात आला आहे़ स्मारकाचे काम अंतिम टप्यात आहे़ लवकरच या स्मारकाचे काम पूर्ण हाेऊन उद्घाटन हाेणार आहे़ बाबासाहेबांनी २९ मे १९२९ राेजी पातुर्डा येथे भेट दिली हाेती़ त्यामुळे हे गाव अतिशय महत्त्वाचे आहे़ या गावात स्मारकासाठी शासनाने ९९ लाख ९२ हजार हजार रुपये मंजूर केले आहेत़