खामगाव (बुलढाणा) : संग्रामपूर तालुक्यात जुने भोन या गावात येत्या बुद्धजयंतीला जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा असलेल्या २३०० वर्षांपूर्वीच्या भोन येथील बुद्ध स्तूपस्थळी अडीच हजार वर्षांपूर्वीच्या आठवणी जागवल्या जाणार आहेत. २३०० वर्षांपूर्वीचा इतिहास स्तूपाच्या रूपाने पुढे आला आहे. त्याठिकाणी पोस्टर प्रदर्शनीच्या माध्यमातून तो अनेकांना पाहता येणार आहे.
संग्रामपूर तालुक्यातील जुने भोन या गावी सम्राट अशोककालीन बुद्ध स्तूप आढळून आला आहे. या ठिकाणी दरवर्षी हजारो बौद्धबांधव बुद्धजयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी येतात. या वर्षीही भारतीय स्तूप व लेणी संवर्धन समितीकडून या ठिकाणी बुद्धवंदनेचा कार्यक्रम आयोजित केला आहे. यावेळी ऐतिहासिक वारशाचा इतिहास जाणून घेता येणार आहे. उत्खननादरम्यान पुढे आलेल्या ऐतिहासिक वारशाची काही तैलचित्रे जपून ठेवली आहेत. या उत्खननात निघालेल्या अनेक वस्तू डेक्कन कॉलेज, पुणे येथे संरक्षित आहेत. त्यांतील काही वस्तू अजूनही भोन या गावात सुरक्षित आहेत. या वस्तू आणि उजागर झालेल्या सम्राट अशोककालीन बुद्ध स्तूप स्थळाची पोस्टर प्रदर्शनी लावली जाणार आहे. यावेळी बुद्ध, भीमगीतांचा जंगी कार्यक्रम होणार आहे.उत्खननात मिळाले अवशेष
बुलढाणा जिल्ह्यात संतनगरी शेगाव येथून २१ कि.मी. अंतरावर पूर्णा नदीच्या तीरावर संग्रामपूर तालुक्यात भोन हे गाव आहे. पुणे येथील डेक्कन कॉलेजच्या पुरातत्त्व विभागातील भास्कर देवतारे यांनी पूर्णा नदीच्या परिसरात २००३ ते २००७ या कालावधीत उत्खनन केले. त्यानंतर १२ ते १३ वर्षांपूर्वी या स्थळाचा शोध लागला. गावात मोठ्या प्रमाणात पुरातत्त्वीय अवशेष आढळले. यामुळे पहिल्यांदाच भोकरदन आणि कौंडिण्यपूर या दोन प्रमुख पुरातत्त्वीय स्थळांच्या दरम्यान असलेल्या या विस्तीर्ण भूभागाचा प्राचीन इतिहास उलगडण्यास मदत झाली.
भाेन येथे विविध प्रकारची वीट बांधकामे उत्खननात स्पष्ट झाली. त्यात स्तूप, कालवा, विटा व मातीच्या कड्या वापरून बांधलेल्या विहिरींचा समावेश आहे. स्तूपाचे अवशेष प्राचीन भोन गावाबाहेर पश्चिमेस आढळून आले. हा स्तूप विटांमध्ये बांधलेला असून आता फक्त त्याचा प्रदक्षिणापथ आणि मेढीचे अवशेष मिळाले आहेत. या स्तूपाच्या मेढीचा व्यास १० मी. असून, प्रदक्षिणापथासहित एकूण व्यास १४ मीटर आहे. हा स्तूप आता वर आला आहे.