लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : स्थानिक नांदुरा रोडस्थित अरबट एक्स रे क्लिनिक आणि सोनोग्राफी सेंटरचे संचालक डॉ. राजेश अरबट यांच्यासह चार जणांवर १८ वर्षीय युवतीचा विनयभंग केल्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात डॉक्टरसह दोन जणांना अटक करण्यात आली आहे. पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, खामगावची १८ वर्षीय युवती डॉ. राजेश अरबट यांच्या हॉस्पिटलमध्ये मागील एक महिन्यापासून काम करीत आहे. तिला याच हॉस्पिटलमधील काम करणारे दीपक अवचार, वैभव देशमुख, महेंद्र गावंडे हे अश्लील हावभाव करून तिचा छळ करीत होते. या संदर्भात तिने डॉ. अरबट यांना याबाबत माहिती दिली असता, त्यांनी यावर कारवाई न करता उलट त्या युवतीला प्रपोज करीत तिच्या लज्जेस ठेच पोहोचवली. या प्रकरणात युवतीने बुधवारी शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी डॉ. राजेश अरबट, दीपक अवचार, वैभव देशमुख, महेंद्र गावंडे यांच्या विरुद्ध भादंवि ३५४ (अ), ५0९, ३४ कलम नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी डॉ. राजेश अरबट आणि वैभव देशमुख यांना अटक केली असून, या प्रकरणाचा तपास ठाणेदार उत्तमराव जाधव यांच्या मार्गदर्शनात पीएसआय सुलभा ढोले करीत आहेत. -
गोरगरिबांना दरमहा हजारो रुपयांची वीज देयके रिडिंग घेणार्यांमुळे होत आहे गोंधळकंत्राटदार व अधिकार्यांमध्ये समन्वयाचा अभाव लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे सध्या सर्वसामान्य गोरगरीब नागरिक त्रस्त झाले आहेत. गरीबांचा विजेचा वापर कमी असतानाही दरमहा हजारो रुपयांची विज बिले देण्यात येत आहेत. मात्र धनदांडग्या, श्रीमंताचा विज वापर जास्त असतांना त्यांना तुरळक बिले देण्यात येत आहेत. हा सर्व प्रकार विज बिल कंत्राटदार व स्थानिक विज वितरण अधिकारी यांचेमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने होत आहे. परंतु यामुळे गोरगरीबांना विनाकारण आर्थीक भुर्दंड सोसावा लागत आहे.मेहकर शहरासह ग्रामीण भागात विज मिटरचे हजारो ग्राहक आहेत. ज्यांच्या घरी फक्त एक लाईट व फॅन आहे. विजेचा अतिशय कमी वापर आहे, त्यांना महिन्याकाठी दोन ते अडीच हजार रुपये बिल आकारण्यात येत आहे. तर याउलट ज्याचा विजेचा वापर मोठय़ा प्रमाणात असताना त्यांना अतिशय कमी बिले देण्यात येतात. गरीबांना जास्त बिले आले की, सदर बिल कमी करण्यात त्यांना विज कंपनी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात. ग्रामीण भागातील ग्राहकांना तर आपली मोलमजुरी बुडवून एसटीचे भाडे खर्च करुन मेहकरला अथवा त्या-त्या गावच्या विज कार्यालयात जावे लागते. एखाद्या गरीब लाभार्थ्याला जर ५ ते ६ हजार रुपये बिल आले तर त्यांचे नाममात्र १ ते दिड हजार रुपये तात्पुरते कमी करुन देण्यात येते. त्यानंतर दुसर्या महिन्यात परिस्थिती जैसे थेच राहते. हा प्रकार सतत सुरु असल्याने गोरगरीब जनता परेशान झाली आहे. यासंदर्भात विज वितरण कंपनीकडे वेळोवेळी तक्रारी करण्यात येतात. मात्र तेरी भी चूप मेरी भी चूप असा प्रकार सुरु असल्याने कारवाई कधीच होत नाही. सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतकरी व गोरगरीब जनता त्रस्त आहे. अशा बिकट स्थितीमध्ये जादा येणार्या बिलामुळे शेतकरी व गरीब कुटुंबियांना न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे.