मलकापूर : घरी कोणी नसल्याचा गैरफायदा घेत बुधवारी दुपारी तालुक्यातील एका अल्पवयीन मतिमंद मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध मलकापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचवेळी आरोपीने विष घेतल्याने त्याच्यावर मलकापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मलकापूर तालुक्यातील एका गावातील १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर दोन वेळा अत्याचार झाल्याची तक्रार पीडितेच्या आईने पोलिसांत दिली. त्यामध्ये घटनेच्या दिवशी पीडितेचे आई-वडील कामानिमित्त बाहेर गेले. त्यावेळी आरोपी घरात घुसला. आई-वडील दुपारी एक वाजताच्या दरम्यान घरी आल्यावर त्यांना आरोपी व मुलगी नको त्या अवस्थेत दिसून आली. त्यांनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला असता झटापट झाली.
आरोपी पळून गेल्यामुळे पीडितेच्या वडिलांनी त्यांच्या मुलाला हा प्रकार सांगितला. त्या मुलाने पोलिस ठाण्याच्या मदत केंद्राला दूरध्वनीद्वारे माहिती दिली. तसेच फिर्यादही नोंदवली. पोलिसांनी पीडित मुलीला उपजिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठवले. याप्रकरणी आरोपी गणेश भाऊराव संभारे (२६) याच्यावर मलकापूर ठाण्यात ३७६ (२), एफ, ३७६ (२) एल, ३७६ (२) एन, ३७६(२)(एक) सह कलम ४,६,८,१० पोक्सोंतर्गत गुन्हे दाखल केले. दरम्यान, आरोपीने विष घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. पुढील तपास उपनिरीक्षक राहुल वरारकर करीत आहेत.