लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शहरातील खड्ड्यांच्या दुखण्यावर ठोस उपाययोजना करण्याऐवजी केवळ भुमीपूजन करून येथील नगरपालिकेच्या वतीने वेळ मारून नेण्याचे काम करण्यात आले आहे. या रस्त्याच्या भूमीपूजनाला जवळपास महिना उलटूनही अद्याप कामाला सुरूवात करण्यात आली नाही. रस्त्याच्या कडेला केवळ बांधकाम साहित्य टाकून काम सुरू असल्याचा देखावा करण्यात येत असून यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संपाप व्यक्त होत आहे.बुलडाणा शहरातील काही रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. यामुळे वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून रस्त्यांची ही अवस्था आहे. यासंदर्भात नागरिकांनी पालिका प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनदेखील तात्पुरत्या मलपट्टीशिवाय ठोस पाऊल पालिकेच्या वतीने उचलण्यात आले नाही. ऐन पावसाळ्याच्या दिवसांमध्ये या खड्ड्यांची संख्या वाढल्याने नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागला. संगम चौक ते तहसील चौक हा शहरातील सर्वात जास्त वर्दळीचा रस्ता आहे. चिखली व खामगाकडे ये-जा करण्यासाठी जड वाहने वगळता इतर वाहनांसाठी हा जवळचा रस्ता आहे. तहसील कार्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयासाठी देखील हाच प्रमुख मार्ग आहे. पालिका प्रशासनाने खड्ड्यांमध्ये मुरूम टाकून रस्त्याची केवळ डागडुजीच केली. यावर्षी सतत पाऊस सुरू असल्याने दुसऱ्याच दिवशी रस्त्याची जैसे थे अवस्था झाल्याने डागडुजीचा कोणत्याही प्रकारचा उपयोग होत नव्हता. अखेर महिनाभरापूर्वी आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते या रस्ता कामाचे भूमीपूजन करण्यात आले. मात्र आतापर्यंत कामास सुरूवात न झाल्याने नागरिकांमधून प्रशासनाविरोधात रोष व्यक्त होत आहे. संगम चौक ते तहसील चौक रस्त्याच्या कामाला लवकरच सुरूवात करण्यात येईल. या रस्त्याचे काम सोपविण्यात आलेल्या ठेकेदाराला यासंदर्भात तत्काळ सूचना देऊन काम सुरू करण्याचे निर्देश देण्यात येतील. नागरिकांची गैरसोय टाळण्याबाबत काळजी घेण्यात येईल.- अभिमन्यू केसकर,अभियंता, नगर परिषद बुलडाणा
रस्ता कामाच्या भूमीपूजनाचा बुलडाणा पालिकेचा केवळ देखावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2020 3:55 PM