वाढते प्रदूषण जागतिक समस्या बनली आहे. त्यामुळे पर्यावरण धोक्यात आले असून, वेळीच सावध होण्याची गरज आहे. जंगल संवर्धन करणे काळाची गरज आहे. बुलडाणा शहराला लागून २० हजार हेक्टर क्षेत्रावर ज्ञानगंगा अभयारण्य विस्तारलेले आहे. अभयारण्यात बिबट्या, अस्वल, लांडगा, रानडुक्कर, तडस, कोल्हा, हरीण, काळवीट, मोर, रानमांजर, ससा, घुबड आदी पशु-पक्षी आहेत. अभयारण्यातून बुलडाणा-खामगाव मार्ग गेलेला असल्याने रस्त्यावर कायम वर्दळ असते. येणारे-जाणारे प्रवासी टाकाऊ वस्तू रस्त्यावर फेकतात. जंगलातून रस्ता ओलांडणाऱ्या वन्यप्राण्यांना यामुळे इजा होऊ शकतात. तसेच टाकून दिलेले प्लास्टिक, शिळे अन्नपदार्थ खाल्ल्याने वन्यप्राण्यांच्या जीवाला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन वन्यजीव विभागाच्या वतीने शनिवारी सकाळी सफाई मोहीम राबवून रस्त्याची सफाई करण्यात आली. गोंधनखेड नाका ते बोथा नाकापर्यंत ही सफाई मोहीम राबविण्यात आली. अकोला वन्यजीव विभागाचे सहायक वनसंरक्षक व्ही. जी. साबळे, बुलडाणा वन्यजीव विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी एम. डी. सुरवसे, अधिनस्थ कर्मचारी, वनसंरक्षक, वनमजूर, गाइड यांच्यासह वन्यजीव सोयरेच्या टीमने या मोहिमेत सहभाग घेतला.
सफाई मोहिमेतून पर्यावरण वाचविण्याचा संदेश !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2021 4:26 AM