- अनिल गवई
खामगाव : स्थानिक सुक्ष्म तरंग पुनरावर्तन केंद्रासाठी मध्य रेल्वेने संपादित केलेल्या जमिनीची तब्बल ४८ वर्षांमध्ये महसुल दप्तरी नोंद नसल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. परिणामी, शासनाच्या लक्षावधी रुपयांच्या महसुलाच्या (अकृषक कराचे) नुकसान होत असून, याकडे संबंधीत विभागाचे जाणिवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे दिसते.
खामगाव शहरातील शेत सर्व्हे नं. १२३ मधुन रा.मा.क्र २/६५/१९७१-७२ प्रमाणे ०.५६ आर जमीन अकृषक असून, जमिनीच्या मुळ मालकाकडून मध्य रेल्वे विभागाने सुरक्ष तरंग पुररावर्तन केंद्राकरीता संपादित केलेली आहे. जमिनीच्या संपादनानंतर या ठिकाणी सुक्ष्मतरंग पुनरावर्तन केंद्र आणि निवासस्थान बांधण्यात आले आहे. तसेच केंद्राच्या जागेला पक्के कुंपन करण्यात आले आहे. मात्र, जमिन संपादीत झाल्यापासूनच या जमिनीची (मध्य रेल्वे )सुक्ष्म तरंग पुनरावर्तन केंद्राच्या नावे करण्यात आली नाही. तशी नोंद देखील ७/१२ नाही. त्यामुळे मुळ मालकाने संपादित जमिनीपैकी ०.५५ आर जमिन दुसºयाला विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, संबंधितांनी ही जमिन १७ डिसेंबर २०१८ रोजी खरेदी करून नोंद देखील करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात कोणतेही दस्तवेज उपलब्ध नाहीत. हक्कनोंदणीमध्येही नोंद नाही.जुन्या नोंदणीचे अधिकार आपल्या स्तरावर नाहीत. यासंदर्भात मध्य रेल्वेला तहसीलदारांमार्फत पत्रव्यवहार करण्यात येणार असल्याचे पटवारी राजेश चोपडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
४८ वर्षांपासून महसूल थकीत!
मध्य रेल्वेने सुक्ष्म तरंग पुनरावर्तन केंद्रासाठी तब्बल ४८ वर्षांपूर्वी म्हणजेच सन १९७१-७२ मध्ये शेत सर्व्हे नं. १२३ मधील ०.५६ जमिन संपादित केली. मात्र, तब्बल ४८ वर्षांच्या कालावधीत या जमिनीची नोंद करण्यात आली नाही. त्यामुळे संबंधित विभागाच्या दप्तर दिरंगाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तथापि, गेल्या ४८ वर्षांपासून या जमिनीचा अकृषक कर (महसूल) थकीत असल्याचे दिसून येते.
सुक्ष्मतरंग केंद्राच्या नावे नोंद करा!
सुक्ष्मतरंग पुनरावर्तन केंद्र, मध्य रेल्वेच्या नावे शेत सर्व्हे नं. १२३ मधील ०.५६ आर जमिनीची नोंद करण्यात यावी. तसेच श्री भरतीया यांनी अनिल खंडेलवाल यांना विकलेल्या विकलेल्या जमिनीची नोंद करण्यासाठी शशीमोहन सु. तापडीया यांनी तहसीलदार खामगाव यांच्याकडे केली आहे.
सुक्ष्मतरंग केंद्राच्या जागेच्या नोंदी संदर्भात तक्रार प्राप्त झाली आहे. या जागेची महसूल दप्तरी नोंद नाही. यासंदर्भातील महसुली अभिलेख अद्यावत करण्यासाठी मध्य रेल्वेशी पत्रव्यवहार करण्यात येईल. तसेच महसूल थकीत असल्यास वसुलीसाठी योग्य ती कारवाई केली जाईल.
- योगेश देशमुख, प्रभारी तहसीलदार तथा नायब तहसीलदार खामगाव.