लोकमत न्यूज नेटवर्कचिखली: येथील कोट्यवधीच्या उडीद खरेदी घोटाळय़ाचे बुलडाणा येथील नाफेड खरेदी केंद्राशी कनेक्शन असल्याची बातमी ‘लोकमत’ने प्रकाशित केल्यानंतर प्रशासनाने गंभीरतेने दखल घेत घोटाळय़ाच्या सखोल चौकशीसाठी जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी बुधवारी धडक कारवाई करीत बुलडाणा येथील खरेदी-विक्रीचे कार्यालय सील केले. सोबतच बीजोत्पादक कंपन्यांकडूनही शेतकर्यांच्या याद्या मागविल्या आहेत. यानुषंगाने गठित चौकशी समितीने १७ जानेवारी रोजी बुलडाणा खरेदी-विक्रीच्या कार्यालयास सील ठोकले असून, सर्व रेकॉर्ड जप्त केले आहे. तसेच अकोला येथील बीज प्रमाणीकरच्या अधिकार्यांकडून प्लॉटचे बियाणे घेतलेल्या शेतकर्यांच्या याद्याही मागविण्यात आल्या आहेत.
चिखली येथील नाफेड अंतर्गत झालेल्या उडीद खरेदी घोटाळय़ाच्या चौकशीला सुरुवात झाल्यानंतर या घोटाळय़ाचे कनेक्शन बुलडाणा खरेदी केंद्राशी असल्याची बाब १६ जानेवारीच्या वृत्तात लोकमतने प्रकाशित केली होती. दरम्यान, घोटाळय़ात चिखली केंद्राप्रमाणेच बुलडाणा केंद्रातही खरेदीत घोटाळा झालेला असल्याने जिल्हा उपनिबंधकांनी १६ जानेवारी रोजी दुपारपासून खरेदी-विक्री व्यवस्थापकाकडे माहिती मागितली. त्यांनी काहीच प्रतिसाद न दिल्याने नानासाहेब चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी समितीने सायंकाळी सात वाजता खरेदी- विक्रीच्या कार्यालयाला सील ठोकले. १७ जानेवारीला त्या कार्यालयात जाऊन संपूर्ण रेकॉर्ड ताब्यात घेतले. महाबीज व इतर खासगी कंपन्यांनी त्यांच्याकडून बियाणे घेणार्या शेतकर्यांच्या याद्या चौकशी समितीने मागवल्या आहेत. राष्ट्रीय बीज उत्पादन कंपनीने याद्या न दिल्याने चौकशीत अडचणी येत आहे. डीडीआर नानासाहेब चव्हाण यांनी राष्ट्रीय बीज उत्पादन कंपनीचे अकोला येथील बीज प्रमाणीकरण अधिकार्यांना पत्न देऊन याद्या मागविल्या आहेत.
दोषींवर कारवाई आवश्यक; मात्र सामान्य शेतकर्यांना चुकारेही मिळावे - तुपकरउडीद खरेदी घोटाळय़ाची चौकशी होऊन दोषींवर कारवाई व्हावी या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागणीवरून सध्या चौकशी सुरू आहे; मात्र यामुळे चौकशी पूर्ण होईपर्यंत आतापर्यंत खरेदी करण्यात आलेल्या उडिदाचे पेमेंट नाफेडने थांबविले आहे. यामध्ये ज्या सामान्य शेतकर्यांनी आपल्या शेतातील उडीद विक्री केला त्यांचेही पेमेंट थांबविण्यात आले आहे. या बाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी संबंधित अधिकार्यांना पत्न देऊन सामान्य शेतकर्यांना पेमेंट थांबवू नका; मात्न ज्या व्यापार्यांनी व दलालांनी शेतकर्यांचे परस्पर सात-बारे घेऊन त्यांच्या नावावर उडीद विक्री करून शेतकरी तसेच शासनाची फसवणूक केली अशांना सोडू नका, असे म्हटले.
चिखलीतही धडक कारवाई गरजेचीनाफेडच्या उडीद खरेदीत चिखली केंद्रावर सर्वाधिक घोटाळा झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे. त्यामुळे बुलडाण्याप्रमाणेच चिखली येथेही धडक कारवाई होणे गरजेचे आहे.
उडीद खरेदीच्या चौकशीनंतर ज्या शेतकर्यांच्या ७/१२ व इतर उतार्यांवर उडिदाची विक्री झाली आहे. त्या शेतकर्यांवरदेखील कारवाई होऊ शकते. यामध्ये अनेक शेतकर्यांचा ७/१२ व्यापार्यांनी परस्पर वापरून त्यावर उडिदाची विक्री केली आहे. त्यामुळे ज्या शेतकर्यांच्या ७/१२ उतार्यांचा गैरवापर झाला आहे. अशा शेतकर्यांनी पुढे येऊन माहिती दिल्यास त्यांवरील कारवाई शिथिल करण्यात येईल व दोषींवर कारवाई केल्या जाईल.- नानासाहेब चव्हाणजिल्हा उपनिबंधक, बुलडाणा