लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : क्षुल्लक वादाचे पर्यवसान हाणामारीत होऊन एका युवकाने डोक्यात घाव घालून मित्राची हत्या केल्याची घटना रविवारी पहाटे मलकापूर बाजार समिती जुन्या यार्डात उघडकीस आली. यामुळे मलकापूर शहरात खळबळ उडाली आहे.मलकापूर शहरातील रेल्वेस्थानक परिसरात वास्तव्यास असलेला गजानन मारोती बोरकर (वय २५) या युवकाचा त्याचा मित्र सूरज धनंजय इंगळे (वय २६) याच्याशी शनिवारी रात्री वाद झाला होता. त्या दोघात चांगलीच हातापायी झाली. त्यात सूरजने गजाननच्या डोक्यात जड वस्तूचा घाव केला. त्यात गजानन बोरकर याच्या डोक्यातून रक्तस्राव होऊन तो खाली कोसळला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.रविवारी पहाटे ६ वाजता हा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती कळताच पोलीस निरीक्षक अंबादास हिवाळे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. नगराध्यक्ष अँड. हरीश रावळ यांच्यासह शहरातील नागरिकही पोहोचले. बाजार समिती यार्डमध्ये झालेल्या खुनाची वार्ता शहरात पोहोचताच एकच खळबळ उडाली. शहर पोलिसांनी मृतकाची आई सुमन गजानन बोरकर (वय ५0 रा.रिसोड नाका वाशिम ह.मु. रेल्वे स्टेशन मलकापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सूरज इंगळेविरुद्ध अपराध नं.५४४/१७ कलम ३0२, ५0४ अन्वये भादंविचा गुन्हा दाखल केला आहे. मलकापूर पोलीस सध्या आरोपीचा शोध घेत आहेत. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक योगेश लवंगळे करीत आहेत.कधी काळी जुने मार्केट यार्डमध्ये मोठा राबता होता; परंतु नवीन मार्केट यार्ड झाल्यामुळे येथे फारसे कोणी फिरकत नाही. त्यामुळे मद्यपी, जुगारी, भिकार्यांचे वास्तव्य अधिक आहे. आता याच ठिकाणी हा खून झाल्यामुळे हे जुने मार्केट यार्ड चर्चेत आले आहे.
जुने मार्केट यार्ड पुन्हा चर्चेत मलकापूर बाजार समितीचे जुने मार्केट यार्ड एकेकाळी भव्य दिव्य असल्याने कामाचे होते; मात्र नवीन मार्केट यार्ड झाल्याने मागील अनेक वर्षांपासून जुने यार्ड अवैध धंद्यांचा अड्डा बनला आहे. जुगारी, दारुडे, भिकार्यांचे वास्तव्य या ठिकाणी असते. आता त्याच जागी दोघांच्या वादात एकाची हत्या झाल्याने जुने मार्केट यार्ड पुन्हा चर्चेत आले आहे. त्यात रेल्वे स्टेशनला अगदी जवळ असल्याने गुन्हेगारीसाठी ही जागा मोक्याची ठरत आहे.
आरोपीचा शोध सुरूआरोपी फरार झाल्याने पोलिसांनी त्याचा कसून शोध घेणे सुरू केला असून, विविध ठिकाणी त्याचा शोध घेण्यात येत आहे. कुर्हा काकोडा, मुक्ताईनगर, सावदा फैजपूर आदी ठिकाणी जाऊन पोलिसांनी आरोपीच्या नातेवाइकांकडे जाऊन आरोपीचा शोध घेतला. आरोपीला लवकरच जेरबंद करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.