बुलडाणा - प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा तथा शिंदे गटाचे आमदारबच्चू कडू यांचा बुधवारी पहाटे अपघात झाला. अज्ञात भरधाव दुचाकीने त्यांना धडक दिली. यात त्यांच्या पायाला व डोक्याला गंभीर दुखापत झाली. येथील खासगी रूग्णालयात उपचार केल्यानंतर दुपारच्या वेळी त्यांना नागपूर येथील खासगी रूग्णालयात हलविण्यात आले. मात्र, आमदार कडू यांचा अपघात होता, की घातपात झाला, असा संशय राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला आहे. त्यासाठी, त्यांनी दोन दिवसांपूर्वी आमदार कडू यांनी केलेल्या विधानाचा दाखलाही दिला.
आमदार बच्चू कडू यांचा दुचाकीच्या धडकेने अपघात झाला. या अपघाताला वेगळंच वळण देण्याचं काम राष्ट्रवादीच्या आमदाराकडून होत आहे. राष्ट्रवादीचे विधान परिषदेतील आमदार अमोल मिटकरी यांनी बच्चू कडूंचा अपघात झाला की, सत्ताधाऱ्यांनी घडवून आणलेला घातपात आहे? असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच, या अपघाताच्या चौकशीही मागणी त्यांनी केली. बच्चू कडू यांनी काही दिवसांपूर्वी विधान केले होते, होत नसेल तर मंत्रिमंडळाचा विस्तार करू नका पण खोट बोलू नका. त्यानंतर, काल त्यांचाही अपघात झाला, असा धागा मिटकरी यांनी जोडला आहे. बुलढाण्यात माँ जिजाऊ जन्मोत्सवासाठी सिंदखेडराजा येथे ते आले होते, त्यावेळी पत्रकारांशी बोलताना आमदार बच्चू कडू यांच्या अपघातासंदर्भात त्यांनी केलेले विधान चांगलेच चर्चेत आले आहे.
त्यादिवशी सरकार कोसळेल
दरम्यान, ज्या दिवशी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईल, त्या दिवशी हे सरकार कोसळेल, असे भाकीतही त्यांनी केले. तर, भाजप नेते किरीट सोमय्या यांचा देखील समाचार घेतला. तसेच शिवसेना फोडण्याचं भाजपचा मिशन पूर्ण झाले. या मंत्री गिरीश महाजनांच्या वक्तव्यावर महाजनांचे आभार देखील त्यांनी मानले.
बच्चू कडूंची प्रकृती स्थीर
बुधवारी सकाळी सहा ते ६.१५ वाजेच्या सुमारास बच्चू कडू हे कुरळपुर्णा येथून अमरावती येथील घरी आले. वाहनातून उतरून डिव्हायडर पार करत रस्ता ओलांडत असताना एका दुचाकीस्वाराने त्यांना जोराची धडक दिली. बच्चू कडू रस्त्याच्या डिव्हायडरवर आदळल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. तसेच, उजव्या पायालाही गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने त्याच मार्गावरील एका खासगी रूग्णालयात हलविण्यात आले. बच्चू कडू यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे.