लोकमत न्युज नेटवर्क शेगाव : आर.एस.एस वाल्यांनी महात्मा फुलेंना बेदखल केले. तीच प्रथा आजही सुरुच आहे. सर्वसामान्य जनतेची पिळवणूक थांबता थांबेना. संविधानामध्ये संतांनी सांगितलेला मार्ग असून हाच मार्ग महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितला आहे. मात्र, तेच संविधान बदलण्याचा प्रयत्न राज्यकर्त्यांकडून सुरु आहे.एकजुटीतून परिवर्तन घडवण्याची आज खरी गरज असल्याचे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे केले. सोबतच त्यांनी बुलडाणा लोकसभा मतदार संघासाठी वंचित बहूजन आघाडीकडून बाळापूरचे आमदार बळीराम सिरस्कार यांच्या नावाची उमेदवारी जाहिर केली. शेगाव येथे शुक्रवारी दुपारी आयोजीत वंचित माळी समाज राजकिय एल्गार परिषदेत ते बोलत होते. माळी समाज राज्यात दोन नंबरवर असताना राजकीय पक्षांनी वाटा कमी दिला. राजकारणात दूर लोटले तसेच समाजातील इतर मागण्यांसाठी शेगांव येथे शुक्रवारी बाळापूरचे आमदार बळीराम सिरस्कार यांच्या अध्यक्षतेखाली एल्गार परिषद घेण्यात आली. उद्घाटक म्हणून राजेंद्र महाडोळे तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डॉ. संतोष हुशे, अॅड. संतोष रहाटे, सुभाष सातव, श्रीराम पालकर, शंकरराव गिºहे, ज.े पी. राऊत, उमेश मसने, आशिष ढोमणे, प्रवीण वाघमारे, प्रवीण निलखान, गणेश मसने, मनोज आंबडकर, प्रवीण पेटकर अमरावती, अमोल बुरुंगले, समीर आरेकर गोंदिया, पवन तिजरे, राजेंद्र घाटे, देविदास गुरनुले, नानाजी आडे, श्रीकांत भुसारी, प्रकाश आताडकर भंडारा, गजानन ठेंगडे, वसंतराव मगर, सदानंद माळी, मंगेश आंबडकर, श्रीकांत ढोमणे, मिलिंद झाडे, देवानंद फुशे, रेणूकताई सिरस्कार, सौ. महाडोळे, धनंजय सिरस्कार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी फुले, आंबेडकर यांच्या विचारांना जीवंत ठेवण्यासाठी राजकारणात परिवर्तनाची गरज असल्याचे स्पष्ट केले. तत्पूर्वी प्रास्ताविक मनोज आंबडकर यांनी केले. त्यानंतर सुभाष सातव, संतोष रहाटे, प्रा. संतोष हुशे यांनी माळी समाज वंचीत असल्याची खंत व्यक्त केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रविण पेटकर तर आभार डॉ. बनकर यांनी मानले. परिषदेला माळी समाज बांधवासह राज्य भरातून आलेले भारिप बहुजन महासंघाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
सरकारने शेतकऱ्यांना छळले : बळीराम सिरस्कार भाजपा सरकार शेतकऱ्यांना त्रास देणारे सरकार असून तरुणांना व्यसनाधीन बनविण्यासाठी या सरकारने काम केले आहे. बहुजनांच्या मुलांची बौद्धिक क्षमता कमी करण्याचे काम केले. राजकिय सत्तेत वाटा असला पाहिजे. राज्यात माळी समाज बहुसंख्येने असूनही माळी समाजाला वाटा कमी मिळत असून इतर पक्ष भांडणे लावण्याचे काम करीत असल्याचे बाळापूरचे आमदार बळीराम सिरस्कार म्हणाले. आतापर्यंत जे काही मिळाले असेल ते बाळासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादामुळे व समाजाच्या भरभक्कम पाठींब्यामुळे मिळाले आहे. समाजाच्या भल्यासाठी ही परिषद ठेवली असून या माध्यमातून लढा उभारायचे आहे. त्यासाठी समाजाची साथ हवी असल्याचेही सिरस्कार यांनी स्पष्ट केले.
एल्गार दिल्लीपर्यंत नेणार : राजेंद्र महाडोळे शेगांव पासून सुरू केलेला एल्गार दिल्लीच्या तक्तापर्यंत नेणार असून राजकिय भागीदारी मिळविण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहे. इतर पक्ष समाजाला राजकारणाच्या लायकीचे समजत नाही. त्यामुळे आम्ही आता बंड पुकारले आहे. शेळी मेंढीचे जीवन जगल्या पेक्षा वाघाचे जीवन जगा असे आवाहनही समाजबांधवांना त्यांनी केले. समाजाने भीक मागणे बंद करा, न्याय मिळत नसेल तर हिसकावून घ्या असेही ते म्हणाले.