शेगाव : येथील भाग दोनचे मंडळ अधिकारी शेतकऱ्यांची कामे करण्यास विलंब व टाळाटाळ करून नोंदी करण्यासाठी लाच मागत असल्याचा आरोप करित मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मंडळ अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जावून बाकड्यांची तोडफोड केली.
नागरिकांच्या जमिनीच्या नोंदी तलाठ्यांमार्फत मंडळ अधिकारी कार्र्यालयाकडून केल्या जातात. मात्र, मागील काही दिवसांपासून तलाठी कार्यालयातून प्रकरण मंजूर होऊन मंडळ अधिकारी कार्यालयापर्यंत गेल्यानंतर विजय बोराखडे रद्द करीत असल्याचा आरोप मनसे जिल्हाध्यक्ष अमित देशमुख, तालुकाध्यक्ष रविंद्र उन्हाळे यांच्यासह मनसे पदाधिकारी व नागरिकांनी केला. त्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालय गाठून या ठिकाणीही मंडळ अधिकारी बोराखडे यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. उपविभागीय अधिकारी रामेश्वर पुरी यांची भेट घेत लाच मागणाऱ्या मंडळ अधिकाऱ्यांकडून नागरिकांना होत असलेल्या त्रासाची माहिती दिली. तसेच ज्या नागरिकांना पैशाची मागणी झाली त्यांना प्रत्यक्ष हजर केले.
यावरून उपविभागीय अधिकारी यांनी मंडळ अधिकारी यांनी प्रलंबित ठेवलेले, रद्द केलेले व मंजूर केलेल्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नायब तहसीलदारांची नियुक्ती करीत असल्याचे सांगितल्याने मनसेच्या सैनिकांनी आंदोलन स`थगित केले. यावेळी रस्ते आस्थापना शहराध्यक्ष परमेश्वर लाहुळकर, विनोद फुंडकर, रामेश्वर भारती, दिनेश माळी, कीशोर लिप्ते, प्रशांत वाढोकार, सुनिल कोकाटे, गजानन वाकळे, दिनेश मुंडलिक, गणेश शेगोकार, हरी पटोकार उपस्थित होते.