बुलडाणा : रविवारच्या साप्ताहिक बाजारात महागडे मोबाइल चोरणार्यांची टोळी सक्रिय झाली आहे. याकडे पोलिसांचे दुर्लक्ष झाले असून, वचक कमी झाल्यामुळे चोरट्यांची हिंमत वाढली आहे. याची वरिष्ठ अधिकार्यांनी दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे. बुलडाणा शहर परिसरात चोरीच्या घटना मोठय़ा प्रमाणात वाढत आहेत; मात्र अनेक तक्रारी पोलीस प्रशासन चौकशीवर ठेवत असल्यामुळे त्यांची दखल घेण्यात येत नाही. याकडे पोलिसांचे दुर्लक्ष दिसून येत आहे. मागील काही महिन्यांपासून दर रविवारी साप्ताहिक बाजारात महागडे मोबाइल चोरणार्यांची टोळी सक्रीय झाली आहे. याबाबत तक्रार देणार्यांना मोबाइल गहाळ झाल्याची तक्रार द्या, असा सल्ला देण्यात येतो. त्यानंतर कोणत्याच प्रकारची चौकशी करण्यात येत नसून, अनेक मोबाईल ग्राहक तक्रार देण्यास टाळाटाळ करीत आहेत. रविवार, ९ ऑगस्ट रोजी साप्ताहिक बाजारात जवळपास सहा मोबाईल चोरीला गेले. प्रत्येक मोबाइल १७ ते २५ हजारांचे होते. त्यामुळे काही मोबाइलधारक पोलीस स्टेशनला तक्रारी देण्यासाठी गेले. यावेळी प्रथम तक्रारी घेण्यास टाळाटाळ करण्यात आली. त्यानंतर मोबाइल चोरीला नव्हे, तर गहाळ झाल्याची तक्रार देण्याचा सल्ला देण्यात आला. असाचा अनुभव अनेक मोबाइलधारकांना आला आहे; मात्र अद्याप मोबाइल चोरटे मिळून आले नाहीत. बसस्थानकावर पाकीटमारांचा सुळसुळाट झाला आहे. याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे मोबाइल चोरट्यांची हिंमत वाढली आहे. याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
मोबाइलचोरांची टोळी सक्रिय
By admin | Published: August 10, 2015 12:54 AM