लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: शाळेतून शीव रस्त्याने जात असलेल्या दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याप्रकरणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने शिरपूर येथील एकास सहा महिने साधी कैद व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दरम्यान दंड न भरल्यास १५ दिवासांची साधी कैद अशी तरतूद शिक्षेत करण्यात आली आहे.बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ अंतर्गतचा हा महत्त्वपूर्ण निकाल प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने २० जून रोजी सुनावला. बुलडाणा तालुक्यातील रायपूर पोलिस स्टेशन अंतर्गत पाच फेब्रुवारी २०१८ रोजी हे प्रकरण घडले होते. सायंकाळी शाळा सुटल्यानंतर पीडित मुलगी व तिची बहिण ही शीव रस्त्याने घरी परत असताना शिरपूर येथील आरोपी कुणाल गवई याने अर्धनग्न अवस्थेत या अल्पवयीन मुलींचा पाठलाग केला व त्यांना पाहून अश्लिल हावभाव केले होते. अशा आशयाची तक्रार पीडित मुलीने रायपूर पोलिस ठाण्यात सहा फेब्रुवारी २०१८ रोजी केली होती. त्यानुषंगाने संबंधित तक्रारीची चौकशी करण्यास येऊन आरोपीस अटक करून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासाअंती पोलिसांनी दोषारोपपत्र बुलडाणा न्यायालयात दाखल केले होते.प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान एकूण सात साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. त्यात अल्पवयीन पीडित मुलगी व तिच्या बहिणीची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. दरम्यान इतर साक्षीदार व पीडित मुलीच्या शाळा मुख्याध्यापकांची जन्मतारखेच्या अनुषंगाने नोंदविण्यात आलेली साक्ष तसेच तपास अधिकारी यांची साक्ष तपासाच्या अनुषंगाने या प्रकरणात सुसंगत व महत्त्वपूर्ण ठरली.त्या आधारावर वादी पक्षातर्फे अॅड. सोनाली सावजी देशपांडे यांनी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. के. महाजन यांच्या समोर बाजू मांडली होती. सोबतच आरोपी कुणाल गवई यास जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी न्यायालयात केली. दरम्यान, प्रकरणात आरोपीचे वय २१ वर्षापेक्षा कमी असल्या कारणाने त्याला शिक्षा सुनावण्यापूर्वी आरोपीच्या एकंदरीत वर्तणुकीबाबत न्यायालयामार्फत परीविक्षा अधिकारी (प्रोबेशन आॅफीसर) यांच्याकडून अहवाल ही मागविण्यात आला होता. त्यानंतर संपूर्ण प्रकरणातील साक्षीपुरावे व निवाडे ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी कुणाल गवई यास बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ च्या कलम ११(४) अतंर्गत दोषी ठरवत शिक्षा सुनावली.या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलिस निरीक्षक सय्यद जलालउद्दीन यांनी केला तर प्रकरणात पैरवी म्हणून सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुरेश लोखंडे यांनी चांगल्या प्रकारे साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यास मदत केली.महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला आळा घालण्याच्या दृष्टीने हा निकाल जिल्हयाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण म्हणावा लागले.(प्रतिनिधी)
दोन शाळकरी मुलींचा विनयभंग; एकास सहा महिन्यांची कैद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 2:32 PM