लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : पाणी भरण्यास गेलेल्या युवतीची काही युवकांनी टॉन्टींग करीत छेड काढल्यावरून खामगावतील सजनपुरी भागात दोन गटात झालेल्या वादाचे पर्यवसन तुफान दगडफेकीत झाले. सायंकाळी ६.३० वाजताचे सुमारास झालेल्या या घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच शिवाजी नगर पोलिस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणली. सजनपुरीतील एक युवती सायंकाळी हातपंपावर पाणी भरण्यासाठी गेली असता, हातपंपाजवळ उभ्या असलेल्या काही युवकांनी तिला ‘टॉन्टींग’ केली. तसेच अर्वाच्च भाषेत शिविगाळ करून छेडखानी केली. हातपंपावर घडलेला हा प्रकार युवतीने आपल्या घरातील ज्येष्ठ मंडळींना सांगितला. तिच्या परिवारातील मंडळींनी शेजारी आणि आपल्या समाजाच्या लोकांना ही हकीकत सांगताच जमाव संतप्त झाला. दोन्ही गट समोरा-समोर धडकले. काही क्षणातच तुफान दगडफेक सुरू झाली. या दगडफेकीत दोन जण जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच शिवाजी नगर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यांनतर जखमींना खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रूग्णालयात भरती करण्यात आले. घटनास्थळी अप्पर पोलिस अधिक्षक हेमराजसिंह राजपूत, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील, शहर पोलिस स्टेशनचे निरिक्षक सुनिल अंबुलकर, शिवाजी नगर पोलिस स्टेशनचे निरिक्षक सुनिल हुड, ग्रामीण पोलिस स्टेशनचे निरिक्षक रफिक शेख यांच्यासह पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणली. (प्रतिनिधी)