विवेक चांदूरकर, लोकमत न्यूज नेटवर्क, संग्रामपूर : स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर प्रथमच मोमिनाबाद, रिंगणवाडी गावात पहिल्यांदाच बस पोहोचली. बुधवारपासून बस सेवा सूरू झाल्याने यूवक आबालवृद्धांनी एकत्र येऊन जल्लोष साजरा केला.
वरवट बकाल ते रिंगणवाडी, मोमिनाबाद बस सेवा परिवहन महामंडळाकडून सूरू करण्यात आली आहे. देश स्वतंत्र होऊन ७५ वर्ष पूर्ण झाली. पण वान नदी काठच्या आडवळणावर वसलेल्या गावांमध्ये बससेवा उपलब्ध नव्हती. गावात बस सेवा नसल्याने येथील ग्रामस्थ, रुग्ण, विद्यार्थी व विद्यार्थिनींना शालेय शिक्षणासाठी तारेवरची कसरत करावी लागत होती. या गावांमधील विद्यार्थी व विद्यार्थिनी वरवट बकाल येथे ये-जा करतात. बस सेवा सुरू झाल्याचा फायदा दररोज शिक्षणासाठी ये-जा करणाय्रा शालेय विद्यार्थ्यांना झाला आहे. या भागात बस सेवा सुरु करण्यात यावी अशी मागणी होती. गावांमधून फार मिळकत नसल्याचे कारण देत महामंळाने अनेकदा ही मागणी टोलावली. निषाद युवा पार्टीचे जिल्हा अध्यक्ष मारोती बोरवार व जिल्हा संयोजक रमेश नादने यांनी १ ऑगस्टला एसटी आगराचे प्रबंधक यांना लेखी निवेदन देत बस सेवा सूरू करण्याची मागणी केली.
४ डिसेंबरला बुलढाणा येथील परिवहन विभागीय कार्यालयातील विभाग नियंत्रकांनी जळगाव जामोद आगारातील व्यवस्थापकांना पत्र देत रिंगणवाडी, मोमीनाबाद बस सेवा सुरू करण्याचे बजावले. अखेर बुधवारी जळगाव जामोद आगाराची वरवट बकाल ते रिंगणवाडी, मोमीनाबाद बस सेवा सूरू करण्यात आल्याने ग्रामस्थांचा आनंद आभाळात टेकला आहे.