खामगाव, दि. ५- दंडेस्वामी मंदिर, सत्यनारायण मंदिर व गोपाळनगर परिसरात पिसाळलेल्या माकडाचा हैदोस सुरू होता. याची माहिती वन विभागाला मिळताच, ४ मार्च रोजी सापळा रचून त्याला पकडण्यात यश मिळविले. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला.मिळालेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून दंडेस्वामी मंदिर, सत्यनारायण मंदिर, गोपाळनगर व घाटपुरी नाका परिसरात पिसाळलेल्या माकडाचा हैदोस सुरू होता. माकडाने अनेक महिला व नागरिकांना चावा घेऊन गंभीर जखमी केले होते; परंतु माकडाला पकडण्यात वन विभागाला यश येत नव्हते. ४ मार्च रोजी वन विभागातील अधिकारी व कर्मचार्यांनी सकाळी १0 वाजेपासून सापळा रचला होता व पाच तासांच्या अथक परिश्रमानंतर माकडाला पकडण्यात यश आले. वनपरिक्षेत्र अधिकारी साळुंखे, वनपाल गीते व सहकारी तसेच बुलडाणा येथील रेस्क्यू टीमने पाच तास अथक परिश्रम घेऊन माकडास जेरीस आणले व इंजेक्शन देऊन बेशुद्ध करून पकडले. या मोहिमेत साळुंखे, वनपाल गीते, वनरक्षक राजू देठे, वाहन चालक मिलिंद जाधव, बावणे, वनरक्षक मांटे, वनपाल वाघ व गोपाळनगर भागातील नागरिक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.या परिसरातील नागरिकांकडून सर्व चमूचे अभिनंदन होत आहे. सदर माकड हे जंगलात नेऊन सोडण्यात येणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी साळुंखे यांनी सांगितले.
पिसाळलेले माकड वन विभागाच्या ताब्यात!
By admin | Published: March 06, 2017 1:46 AM