बुलडाणा : धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे निरपराध पाच भिक्षुकारांना ठार मारणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, हा खटला जलदगती न्यायालयातचालवावा, मृतकाच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपये देऊन त्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरीत सामावून घेण्यात यावे, पालन पोषणासाठी वनविभागाची पडीक ५ एकर जमीन कुटुंबाला देण्यात यावी, यासह इतर मागण्यांसाठी सोमवारी नाथपंती डवरी गोसावी भटक्या समाज संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.गांधीभवन येथून सुरु झालेल्या मोर्चाचे नेतृत्व संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान सावंत व जिल्हा उपाध्यक्ष नारायण शिंदे यांनी केले.या मोर्चात जिल्ह्यातील नाथपंथी, डवरी, गोसावी यासह भटक्या विमुक्त जातीचे समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले. हा मोर्चा जयस्तंभ चौक, स्टेट बँक चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी मोर्चाचे जाहिर सभेत रुपांतर झाले.यावेळी भगवान सावंत व नारायण शिंदे यांनी मोर्चाला मार्गदर्शन केले.त्यानंतर संघटनेच्या शिष्टमंडळाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. साक्री तालुक्यातील राइनपाडा येथील सामुहिक हत्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, हा खटला जलदगती न्यायालयात चालवून यासाठी अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी, समाजातील प्रत्येक व्यक्तीला ओळखपत्र देण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या.या मोर्चात भाववलाल सनिसे, लिलाबाई सनिसे, पांडुरंग शिंदे, सौदागर सावंत, राजू साबते, अनिल साबुके, आकाश जगताप, विजय शिंदे, तोताराम शिंदे, राहुल जगताप, धृपदाबाई शिंदे, कचराबाई सावंत, योगेश शिंदे, एकनाथ जगताप, पंजाबराव चव्हाण, मछिंद्र सोळंके, सुभाष सोळंके, नवल सोळंके, धनाजी सोळंके, ईश्वर सोळंके, सोनाजी सावंत, गोपालराव चव्हाण, सागर शिंदे, साईनाथ शिंदे, वरुन सोळंके, डिगांबर शिंदे, एकनाथ शिंदे, तानाजी सावंत, सामन सोनारे, उत्तम सावंत, पंडीत जगताप, बबन जगताप, अर्जुन सावंत, सचिन सोळंके, कैलास सावंत, एकनाथ जगताप, रतन जगताप, मनोहर शिंदे यांच्यासह असंख्य भटके विमुक्त समाजबांधव सहभागी झाले. या मोर्चाला शिवसेना, कॉंग्रेस, भारिप बहुजन महासंघ यांनी पाठिंबा दिला. या मोर्चात खासदार प्रतापराव जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत, माजी आमदार विजयराज शिंदे, उपजिल्हाप्रमुख संजय गायकवाड, कॉंग्रेसचे सतिष मेहेंद्रे यांच्यासह विविध पक्षातील पदाधिकारी सहभागी झाले.
नाथपंथी संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2018 6:08 PM