लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : कोरोना विषाणू संक्रमण कालावधी कृषी उत्पन्न बाजार समितीतील तत्कालीन संचालक मंडळ आणि प्रशासनाला भ्रष्टाचाराचे कुरण असल्याचेच सिद्ध होते. या कालावधीत शेतकऱ्यांच्या लक्षावधी रुपयांची उधळपट्टी करण्यात आल्याने संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे.कोरोना विषाणू संसर्ग कालावधीत खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने भोजन पाकिटे, जीवनावश्यक वस्तू संच वाटपात लक्षावधी रुपयांची अनियमिता केल्याचे उघड झाले. त्यानंतर ३ लाखांपर्यंतचा खर्च निविदा न मागविताच केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. भ्रष्टाचारासाठी मर्यादेपेक्षा जास्त खर्च करण्यात आल्याने बाजार समितीचे सभापती, तत्कालीन संचालक मंडळ आणि संचालकांवर कोणती कारवाई केली जाते याकडे, लक्ष लागले आहे. बाजार समितीतील विविध अनियमिततेप्रकरणी द्विसदस्यीय चौकशी समितीने ६८० पानांचा अहवाल जिल्हा उपनिबंधक बुलडाणा यांच्याकडे सादर केला आहे. मात्र, या अहवालावर जिल्हा उपनिबंधकांकडून अद्यापपर्यंत कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे कुठे तरी पाणी मुरत असल्याच्या शंकेला वाव मिळत आहे.
सॅनिटाईज टनेल उभारणीवर उधळपट्टी! कृषी उत्पन्न बाजार समितीत सॅनिटाईज टनेल उभारणीवर तीन लक्ष ९४ हजार रुपयांची उधळपट्टी करण्यात आली. याबाबत चौकशी समितीने आक्षेप नोंदविला आहे. निविदा मागवितानाच्या अटीनुसार टनेल सहा महिन्यांत बंद पडल्यास दुरुस्त करून द्यावे लागेल, त्यासंबंधातील कोणताही खर्च अदा केला जाणार नसल्याचे म्हटले आहे. मात्र, चौकशी समितीच्या प्रत्यक्ष पाहणीच्या वेळी टनेल बंद होते. त्याचप्रमाणे बंद टनेल दुरुस्तीच्या दिशेने कोरोना काळात कोणतेही प्रयत्न बाजार समितीने केले नसल्याचा आक्षेपही चौकशी समितीने नोंदविला आहे.